Haryana Election 2024 : हरियाणात काँग्रेसचे स्वप्न भंगले, भाजपाने तिसऱ्यांदा मारली बाजी

Haryana Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होऊन आज दि. 8 रोजी मतमोजणी पूर्ण झाली. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. आज झालेल्या मतमोजणीत हरियाणात पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयासह तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार करत जवळपास 49 जागांंचा आकडा गाठला आहे. तर काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावे लागले.

एक्झिट पोलच्या निकालांवरून निवडणुकीत कॉंग्रेस बाजी मारेल असं सर्वांनाच वाटलं होतं. त्यामुळं जवळपास सर्वच राजकीय पंडितांनी भाजपचा यंदा पराभव होणार असल्याची भाकीतं केलं होतं. पण सगळ्या एक्झिट पोलचा धुव्वा उडवत भाजपने निवडणुकीत काँग्रेसला आसमान दाखविले आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाणा निवडणुकीत भाजपला सलग तिसऱ्यांदा जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोदींचे ‘उज्जवल मॅन’ म्हणूनही त्यांची ओळख आहे. यापूर्वी राज्यात सलग तीन निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाला जिंकता आल्या नव्हत्या.

हरियाणातल्या मोठ्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला हरियाणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय मिळाला आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं भाजपच्या जागांमध्ये मात्र वाढ झालेली दिसतेय.

या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांचाही विजय झाला आहे. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे देखील लाडवा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. शेवटी भाजपच्या हरयाणवी  विजया मागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपचे निवडणूक व्यवस्थापन. हरियाणाचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी या निवडणुकीत स्वतःला झोकून देत जबाबदारी सांभाळली. त्यांच्यासह सहप्रभारी विप्लव देव यांनीही छोट्या-मोठ्या सभांच्या माध्यमातून रिअल टाईम फीडबॅक घेत उणीवा दूर करत विजयासाठी महत्त्वाची भूमिका बाजावली. या निवडणुकीत भाजपच्या या निवडणूक व्यवस्थापन पथकाने हरियाणातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यात आणि कमकुवत बूथ ओळखून अन्य पक्षांच्या तगड्या कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यात मोठी भूमिका बजावली.

हरियाणात आतापर्यंत एकदाही तिसऱ्यावेळी एकाच पक्षाचे सरकार निवडून आलेले नाही. त्यामुळे भाजपचा हरियाणातील विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. 1980 साली भाजपची स्थापन झाल्यानंतर पक्ष पहिल्यांदा हरियाणात मैदानात उतरला होता. 1982 साली हरियाणात भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. 1986 मध्ये भाजपने 16, 1996 मध्ये 11, 2000 मध्ये 6 आणि 2005 साली भाजपला अवघ्या दोन जागांवर विजय मिळवता आला होता. तर 2014 साली भाजपने 33.3 टक्के मतं मिळवत सर्वाधिक 47 जागा मिळवल्या होत्या. तेव्हापासून भाजपाची विजयी घोडदौड सुरु आहे.