---Advertisement---
---Advertisement---
मध्यप्रदेशच्या एका शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ३ रुपये नमूद करण्यात आले होते. उत्पन्नाचा दाखला व्हायरल झाला आणि सगळे जण शेतकऱ्याला देशातील सर्वात गरीब माणूस म्हणू लागले. यानंतर जिल्हाधिकारी सक्रिय झाले. त्यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले. लिपिकाकडून झालेल्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासनाची मात्र धांदल उडाली. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.
सतना जिल्ह्यातील कोठी तहसीलमधील नयागावात राहणारे रामस्वरूप यांना जारी करण्यात आलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा एक फोटो आठवडाभरापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर तहसीलदारांची स्वाक्षरीदेखील आहे. २२ जुलैला तहसीलदार सौरभ द्विवेदी यांनी स्वाक्षरी केलेला दाखला प्रचंड व्हायरल झाला. यानंतर अनेक इंटरनेट युझर्सनी रामस्वरूप यांना देशातील सर्वांत गरीब व्यक्ती म्हटले. रामस्वरूप यांची मासिक कमाई २५ पैसे असल्याचा उल्लेख दाखल्यामध्ये होता.
रामस्वरूप यांच्या उत्पन्नाचा दाखला सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाला. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी २५ जुलैला एक नवीन प्रमाणपत्र जारी केले. त्यात शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न ३० हजार रुपये म्हणजेच मासिक उत्पन्न २५०० रुपये नमूद करण्यात आले. यानंतर तहसीलदार सौरभ द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले. लिपिकाकडून चूक झाली होती. ती सुधारण्यात आली आहे. नवीन उत्पन्न दाखला जारी करण्यात आलेला आहे, अशी सारवासारव द्विवेदी यांच्याकडून करण्यात आली.