हत्तीला अंघोळ घालायला गेला अन…. जीवाला मुकला; 27 वर्षीय महावताचा दुर्दैवी मृत्यू…!

---Advertisement---

 

केरळ राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी थरारक घटना समोर आली आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात एका क्रोधीत हत्तीच्या हल्ल्यात 27 वर्षीय महावताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना गुरुवारी सकाळी सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केरळ राज्यातील नय्यर धरणाजवळ असलेल्या या पुनर्वसन केंद्रात महावत नेहमीप्रमाणे संबंधित हत्तीला अंघोळीसाठी जलाशयाकडे नेत होता. मात्र अचानक कोणताही इशारा न देता हत्ती क्रोधीत झाला. त्याने थेट त्याच्या सोंडेने महावताला जोरदार उचलून फेकले.
या जबर धक्क्यामुळे महावत थेट जलाशयात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याची अवस्था गंभीर बनली. घटनेची माहिती मिळताच पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत महावताला पाण्याबाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मृत महावत गेल्या काही वर्षांपासून कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात कार्यरत होता. हत्तींच्या देखभालीचा त्याला मोठा अनुभव असल्याने ही घटना अधिकच धक्कादायक मानली जात आहे. अनुभवी कर्मचाऱ्याबरोबर अशी दुर्घटना घडल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रात भीतीचे वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस आणि वन विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हत्ती अचानक का क्रोधीत झाला, नियमांचे पालन झाले होते का आणि कोणतीही निष्काळजीपणा झाला का, याचा सखोल तपास सध्या केला जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, तरुण महावताच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---