United Nations : इस्रायली सैनिकांनी १५ वैद्यकीय कर्मचारी आणि आपत्कालीन बचाव पथकावर गोळीबार करून हत्या केली आणि त्यांना दक्षिण गाझामधील सामूहिक कबरीत पुरत्याचा दावा मदत संस्थांनी केला, यावर मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रवक्ते टॉम फ्लेचर यांनी निवेदनात म्हटले की, इस्त्रायली सैन्याने वैद्यकीय कर्मचारी आणि बचाव पथकावर जाणीवपूर्वक गोळीबार केला. त्यानंतर त्यांचे मृतदेह सामूहिकरीत्या पुरण्यात आले. गेल्या १८ महिन्यांत १०० पेक्षा अधिक नागरी संरक्षण कर्मचारी आणि हजारपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचारी इस्रायली हल्ल्यांमध्ये ठार झाले. हा प्रकार मानवतेला काळीमा फासणारा आहे. तेल अल-सुलतानच्या किनाऱ्यावरील एका ओसाड भागात मृतदेह पुरल्याचा दावा मदत संस्थांनी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे पथक तेथे पोहोचले. ठार करण्यात आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एकत्र पुरल्याचे आढळले. इस्त्रायलला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
१० दिवसांत ३०० मुलांचा मृत्यू
इस्त्रायलच्या हल्ल्यात मागील दहा दिवसांत ३०० पॅलिस्टिनी मुलांचा मृत्यू झाला, तर ६०९ जखमी आहे. १८ मार्च रोजी इस्त्रायली सैन्याने रुग्णालयांवर हल्ले केले, यात नवजात बाळांसह १ ते ५ वयोगटातील शेकडो मुले दगावली. गेल्या १८ महिन्यांत १५ हजारांपेक्षा अधिक मुले आणि ३४ हजार नागरिक जखमी झाले. युद्धामुळे १० लाख मुले विस्थापित झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवेदनात देण्यात आली.