चाळीसगाव : सुखी संसार होण्याआधीच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकताच साखरपुडा झालेल्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. मोहन भाईदास सोनवणे (वय २६, रा. जामदा, ता.चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना २९ रोजी तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भाईदास सोनवणे (वय २६) रा. जामदा, ता.चाळीसगाव हा तरुण मेहुणबारे गावाजवळ तिरपोळे रस्त्यावरुन ट्रॅक्टरवर बसून जात असताना, ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने मोहनचा जागीचा मृत्यू झाला.
मोहनचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता आणि आता घरात त्याच्या लग्नाची तयारी सुरु होती. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला वैद्यकिय आधिकारी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अरुण पाटील हे करीत आहेत.