मुंबई : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यभरात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. विदर्भ आणि कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे.
राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. तर बंगालच्या उपसागरात उत्तर-पश्चिमेकडे, ओडिशाच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रभावामुळे राज्यात काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. येत्या दोन दिवसांत कोकण-गोव्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने काही भागात येलो अलर्टचा इशारा दिला आहे. यात मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्ह्यापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील इतर भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नांदेड, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
उत्तर कोकणात पावसाचा जोर मंगळवारी सकाळपासून कायम होता. रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडीतील पाणी पातळी धोक्याच्या पातळी जवळ पोहोचली आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
चिपळूण कराड रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झालेली आहे. दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून थोड्या वेळात वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच साताऱ्यातील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. आंबेनळी घाटातील चिरेखिंड गचजवळ दरड कोसळल्याने पर्यटक अडकून पडले आहेत. लोणावळ्यात गेल्या २४ तासात तब्ब्ल २२० मिलीमीटर पाऊस तर ४८ तासात ४३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने तेथेही पर्यटकांचे हाल होत आहेत.