जळगाव । बंगालच्या उपसागरांत येत्या काही तासांमध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मान्सूनला चालना मिळाली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता असून या दरम्यान, आज हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने आज मंगळवार १८ जुलै २०२३ रोजी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच २१ जुलै २०२३ पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५, तर काही ठिकाणी तो ताशी ५५ किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे.
या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.