तरुण भारत लाईव्ह ।१३ मार्च २०२३। राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून देशाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाची दुसरी फेरी देशात पाहायला मिळेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांमध्ये उष्णतेच्या वाढत्या तणावामुळे यंदा मान्सूनपूर्व सरी या नियोजित वेळेआधीच सुरू झाल्यात. त्यामुळे संपूर्ण देशाला या हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे. सामान्यतः मान्सूनपूर्व हवामान हे मार्चच्या उत्तरार्धात सुरू होतं. परंतु, फेब्रुवारीमध्येच तापमानामध्ये अधिक उष्णता वाढल्यामुळे यंदा लवकरच अवकाळी पावसाला सुरू झाली.
१३ ते १८ मार्च दरम्यान देशामध्ये मध्यपूर्व आणि दक्षिणेच्या भागात व्यापक प्रमाणात मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. यावेळी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या औषधी हवामानामुळे पिकांवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.