बंगाल,ओडिशामध्ये हाय अलर्ट; ‘दाना’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार, 14 जिल्ह्यांतील दोन दिवस शाळा बंद

#image_title

बंगाल आणि ओडिशामध्ये प्रशासनातर्फे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात ‘दाना’ नावाच्या चक्रीवादळाचा वेग वाढत असून येत्या दोन दिवसांत बंगाल, ओडिशा किनारपट्टीवर येऊ शकते.

एजन्सी हाय अलर्टवर
या चक्रीवादळाची गती तासी 120 किलोमीटरपर्यंत असू शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), तटरक्षक दल आणि सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि जीवित व मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी, यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

ओडिशा आणि बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये, प्रशासनाने शाळा आणि समुदाय इमारतींना मदत केंद्र म्हणून तयार केले आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जे आधीच समुद्रात आहेत त्यांना परत बोलावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी यंत्रणांनी लोकांना शांत राहण्याचे आणि प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांत वीज, पाणी आणि अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. ‘दाना’ वादळामुळे किनारपट्टी भागात महामार्ग आणि रेल्वे सेवा काही काळ प्रभावित होऊ शकतात.

विशेष मदत आयुक्त डीके सिंह यांनी शाळा आणि जनशिक्षण विभागाला खबरदारीचा उपाय म्हणून 23 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संभाव्य बाधित 14 जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे. गंजम, पुरी, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, मयूरभंज, केओंझार, ढेंकनाल, जाजपूर, अंगुल, खोरधा, नयागड आणि कटक जिल्ह्यात शाळा बंद राहतील. दिवाळीपूर्वीच या चक्रीवादळाच्या आगमनाने लोकांची चिंता वाढली आहे.