बुलंद वाणी.. बुलंद लेखणी.. लोकशायराची

ऑगस्ट महिना क्रांतीचा, स्वातंत्र्य उत्सवाचा, कडुगोड स्मृतींचा! ‘१ ऑगस्ट १९२०, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच!’ हा बुलंद भीष्मप्रतिज्ञा स्वरुप आवाज स्वातंत्र्याचे जनक मानलेल्या लोकमान्य टिळकांच्या रुपात काळाच्या पडद्याआड गेला आणि समरसतेेची क्रांतीज्योत स्व. तुकाराम भाऊ तथा अण्णाभाऊ साठेंच्या जन्माने नव्याने प्रज्वलित झाली. आजच्या दिवशी या दोन्ही नररत्नांच्या स्मृतींना वंदन करुया!
लोकमान्य टिळक स्वातंत्र्य चळवळीचे जनक मानले जातात. त्यांची भाषा संस्कृत प्रचूर, प्रखर परंतु सामान्य जनांना एकदम जवळची, आपली न वाटणारी होती. लोकमान्य प्रकांड पंडित, गाढे अभ्यासक व कठोर टीकाकार होते. एकटे गीतारहस्य त्यांची थोरवी सांगण्यास पुरेसा आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भाषा रांगडी, सरळ सोपी आणि सामान्यांच्या तोंडी असणारी, त्यांच्या हृदयाला भिडणारी, त्यामुळे त्यांची लोकगीते व पोवाडे अजरामर ठरले.
भारतभूमी नररत्नांची खाण खरोखर होती व आहे. जरा खुल्या मनाने, पूर्वग्रह बाजूला ठेवून, इतिहासाचा मागोवा घेतला तर या सार्‍या नररत्नांनी नरवीरांनी, संतमहंतांनी, एकात्म तथा समरस व बलशाली समाजाचे स्वप्न समोर ठेवून कार्य कर्तृत्त्व केलेले आहे..

राजे छत्रपति शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, संत रोहिदास, जगतगुरू तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी विठ्ठलरावजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी अशा अनेक महानुभवांची नावे प्रामुख्याने डोळ्यासमोर उभ राहतात. साहजिकपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावही यात अगत्याने येते.सामाजिक समतेसाठी लढणारे अण्णाभाऊ साठे थोर साहित्यिक, गीतकार व लोकशाही होते. त्यांचे साहित्य कसदार, बाणेदार, सामान्यांना सहज समजणारे व आवडणारे आहे, याचे ज्वलंत व जागते उदाहरण म्हणजे त्यांची फकिरा ही गाजलेली कादंबरी होय.

दलित चळवळ, साहित्याची विद्रोह आणि नकारात्मकता ही दोन मुख्य विशेषणे होत. परंतु अण्णांनी त्यात आततायीपणा, आक्रोश येऊ दिला नाही. शिव्याशापांचे तंत्र अवलंबले नाही. कधी कुठे आकांड-तांडवही आढळत नाही. परंतु सामाजिक अन्यायाला संयमी भूमिकेतून, परखड शब्दांतून सामाजिक अन्यायाला वाचा फोडण्याचे काम सातत्याने त्यांनी केले. एक विधायक व उपयुक्त पर्याय अण्णाभाऊंच्या रुपाने व साहित्याने समाजाला दिला. त्यांनी समाज तोडणीला नव्हे तर समाज जोडणीला प्राधान्य दिलंय. साहित्यातून गीतातून समाजजोडणीचा पुरस्कार केला. सामाजिक समरसता निर्मिती कार्यात असणार्‍या कार्यकर्त्यांनी हा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे अपेक्षित असते. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच शब्दांत कार्यकर्त्यांना संदेश हाच आहे… दुभंगलेली मने जोडा, मना-मनांतील भेदभाव घालवा आणि सर्वांत देशभक्तची पेरणी करा!

योगाचार्य वसंत चंद्रात्रे
माजी सिनेट सदस्य,
कबचौउमवि, जळगाव
९८२३१०७८०४