दुशांबे : मध्य आशियाई देश असलेल्या ताजिकिस्तानने हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे आहे. ताजिकिस्तानने हिजाब तसेच ईदबाबत नवीन निर्बंध लादले आहेत. नियमांचे उल्लंघन करुन हिजाब घातल्यास दंडही आकारण्यात येईल. विशेष म्हणजे, ताजिकिस्तान हा मुस्लीमबहुल देश आहे. या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९५ टक्के लोक हे मुस्लिम धर्मीय आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नवीन निर्बंधांबाबत नुकताच एक नवीन कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला दि. १९ जून २०२४ रोजी ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार, ताजिकिस्तानमध्ये हिजाब विकणे, परिधान करणे किंवा त्याचा प्रचार करणे हा गुन्हा असेल.
ताजिकिस्तानच्या या नव्या कायद्यात हिजाबला ‘परदेशी संस्कृती’ असे संबोधण्यात आले आहे. ताजिकिस्तानमध्ये आता कोणी हिजाब घातला किंवा विकला तर त्याला किंवा तिला तीन लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. या कायद्यात ताजिकिस्तानने ‘ईदी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ईदच्या सणावर मुलांना दिल्या जाणाऱ्या पैशांवरही बंदी घातली आहे. आता ते नवरोज, ईद आणि बकरीदच्या सणांना मुलांना देता येणार नाही.
ताजिकिस्तानच्या या निर्णयावर जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे, कारण ते जवळजवळ पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र आहे. ताजिकिस्तानची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे, त्यापैकी सुमारे ९५ लाख मुस्लिम आहेत. यानंतरही ताजिकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, ताजिकिस्तान सरकारने आपल्या देशातील स्थानिक परंपरा वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हिजाब घालणे हे धर्माचे खुले प्रदर्शन आहे, असे कायद्यात सांगण्यात आले आहे.
ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन हे देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. १९९४ पासून ते ताजिकिस्तानमध्ये सत्तेवर आहेत. ताजिकिस्तान पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग होता. सोव्हिएत युनियनमध्येही धर्माचे खुलेआम प्रदर्शन आणि प्रचार करण्यास बंदी होतो. हाच नियम ताजिकिस्तानमध्येही सुरू आहे.