---Advertisement---
जागतिक तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली तर शतकाच्या अखेरीस हिंदुकुश हिमालयातील बर्फ ७५ टक्क्यांपर्यंत वितळू शकतो, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास दोन अब्ज लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
जर जगातील देशांनी पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवले तर, हिमालय आणि कॉकेशसमधील ४० ते ४५ टक्के हिमनदीतील बर्फ संरक्षित राहील, असे सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे. मात्र जर वर्तमान हवामान धोरणे कायम राहिली आणि जगाचे तापमान २.७अंश सेल्सिअसने वाढले, तर जगातील केवळ २५ टक्केच बर्फ टिकून राहील, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
२०१५ च्या पॅरिस कराराने ठरवलेले उद्दिष्ट १.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानवाढ मर्यादित ठेवल्याने सर्व प्रदेशांमध्ये काही प्रमाणात हिमनदीचा बर्फ टिकून राहण्यास मदत होईल, असे या अभ्यासात अधोरेखित करण्यात आले आहे. जर हे उद्दिष्ट पूर्ण झाले तर सध्याच्या हिमनदीतील ५४ टक्के बर्फ जागतिक स्तरावर आणि २० ते ३० टक्के चार सर्वात संवेदनशील प्रदेशांमध्ये राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हिमनद्या वितळण्याकडे आणि त्याच्या परिणामाकडे जागतिक नेते लक्ष वेधत असताना, हे निष्कर्ष समोर आले आहेत. हिमनद्या वितळण्यामुळे जीवसृष्टीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. यामध्ये आशियातील २ अब्जाहन अधिक लोकांचे जीवनमान देखील समाविष्ट आहे. ग्रह-तापमानवाढ उत्सर्जन कमी करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेकडे वळणे हा हिमनद्या वितळण्याचा वेग कमी करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे, असे आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष विंगमिंग यांग म्हणाले.
या क्षेत्रांवर होईल सर्वाधिक परिणाम
युरोपातील आल्प्स, अमेरिका आणि कॅनडातील पर्वतरांगा आणि आइसलँडला तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसेल. या भागातील सर्व बर्फ वितळू शकतो. तापमानात दोन अंशांची वाढ झाल्यास २०२० च्या पातळीपेक्षा १० ते १५ टक्के बर्फ राहील.
---Advertisement---