जळगाव : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे २४ डिसेंबर रोजी शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता भव्य हिंदू राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून हिंदू राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार विविध माध्यमांतून सुरू आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून शिवतीर्थ मैदान झेंड्यांनी भगवेमय झाले आहे.
शहरातील सभेचे मैदान सज्ज झाले असून शहरासह जिल्हाभरात सभेसंदर्भात माहिती पत्रके वाटप करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शहरात रिक्षांवर सभेची माहिती पत्रके लावण्यात आली आहे. तसेच रिक्षाच्या माध्यमातून लाऊडस्पीरकरव्दारे सभेची माहिती दिली जात आहे. शुक्रवारी बाईक रॅली काढून हिंदू राष्ट्र जागृती सभेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रविवारी होणाऱ्या सभेला हिंदू बांधवांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता त्याठिकाणी मैदानावर व्यासपीठासह बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या विविध प्रभागांतून धर्माभिमानी ढोल, ताशांच्या गजरात सभास्थळी पोहचण्याचे नियोजन करतांना दिसत आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी सभेच्या पूर्वतयारीचे अवलोकन केले.
पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन
सभेला शिवतीर्थ मैदानावर रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच हिंदू बांधव जिल्हाभरातून कोर्ट चौकात दाखल होणार असल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
यांचे सभेत मार्गदर्शन
हिंदू राष्ट्र-जागृती सभेत चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी, सनातनचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छतीसगड राज्य संघटक सुनील घनवट, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर मार्गदर्शन करणार आहेत.
आमदार भोळे यांचे उपस्थितीचे आवाहन
हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवतीर्थ मैदानावर रविवारी होणाऱ्या या हिंदू राष्ट्र सभेला जास्तीत जास्त संख्येने हिंदू बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले.