---Advertisement---
संपूर्ण हिंदू समाजाला एक करण्याचे लक्ष्य आम्ही गाठत नाही, तोपर्यंत आम्हाला चालत राहायचे आहे आणि हे मैत्री, उपेक्षा, आनंद आणि करुणा चार मार्गदर्शक सिद्धांताच्या आधारेच शक्य आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे केले. दैनंदिन जीवनात देशभक्तीचा अवलंब करत देशासाठी जगण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी ‘१०० वर्षांची संघयात्रा, नवे क्षितिज’ या शीर्षकाखाली राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित त्रिदिवसीय संवाद कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. मोहनजी भागवत संबोधित करत होते. व्यासपीठावर सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, उत्तरक्षेत्र संघचालक पवन जिंदल आणि दिल्ली प्रांत संघचालक डॉ. अनिल अग्रवाल उपस्थित होते.
महात्मा गांधींनी ज्या सात पापांच्या शाश्वत धोक्यांचा इशारा दिला होता, त्याचा उल्लेख करत डॉ. भागवत म्हणाले की, आजच्या परिस्थितीत हा इशारा अधिक प्रासंगिक ठरू लागला आहे.
पंचपरिवर्तनाचा केला आग्रही पुरस्कार
संघाच्या भविष्यातील वाटचालीची रूपरेषा विशद करताना डॉ. भागवत यांनी पंचपरिवर्तनाचा तपशीलवार आढावा घेतला. कुटुंबप्रबोधन, पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक समरसता, आत्मनिर्भरता आणि संविधान तसेच कायद्याचे पालन करण्याचा आग्रह धरला. सगळ्या मानवी जिवांसाठी पाणी, मंदिर आणि स्मशान एकच असले पाहिजे. आज देशासाठी मरण्याची नाही तर २४ तास जगण्याची गरज आहे, असे हितोपदेश करत ते म्हणाले की, घरात पूजाघर चांगल्या ठिकाणी बनवले गेले पाहिजे. अडचणीच्या आणि गैरसोयीच्या ठिकाणी नाही. आम्ही राहू अथवा न राहू पण भारत देश राहिला पाहिजे, त्यानुसार सर्वांनी आपली वागणूक ठेवली पाहिजे. विश्वगुरुपदाचा अत्यंत नम्रपणे स्वीकार करत आपल्या आचरणातून त्याची प्रचीती आणून दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
जागतिक व्यापार स्वेच्छेने व्हावा, दबावाने नाही
आंतरराष्ट्रीय व्यापार हा स्वेच्छेने झाला पाहिजे, दबावाने नाही, असे नमूद करत डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, शेजारी देशांशी आम्ही आपले संबंध सौहार्दपूर्ण केले पाहिजे. त्यांच्याही विकासाचा विचार केला पाहिजे, कल्याणाचा आणि सुरक्षितेचा आग्रह धरला पाहिजे. भारताची शेजारी देशांशी वागणूक ही मोठ्या भावासारखी राहिली पाहिजे.
हिंदू हा विश्वाला शांती देणारा धर्म
जगात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर तिसऱ्या महायुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय संस्था शांततेचा तोडगा काढू शकल्या नाहीत, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, या जागतिक समस्यांतून धर्मसंतुलन आणि भारतीय दृष्टिकोन यातूनच तोडगा निघू शकतो. सर्व जण उपभोगवादाच्या मागे धावत असल्यामुळे स्पर्धा होते, त्यामुळे आपसात भांडणे होतात, त्यातून जग नष्ट होण्याची भीती निर्माण होते. मात्र आमची विचारधारा ही सर्वांच्या कल्याणाची आहे, धर्म हा सार्वभौमिक आहे आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात आहे. तुम्ही विश्वास ठेवा वा ठेवू नका, पण हिंदू धर्म विश्वाला शांती देणारा धर्म आहे. अनियंत्रित उपभोक्तावाद आणि भौतिकवादाने आमचा संयम आणि पारंपरिक मूल्यांवर घाला घातला आहे.