---Advertisement---
बांगलादेशात मागील १८ दिवसांत सहा हिंदूंच्या हत्येमुळे येथील समुदायात दहशत निर्माण झाली आहे. जीव वाचविण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेश सोडण्याच्या तयारीत आहेत. सरकारचे हिंदूंच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष आहे, तर कट्टरवाद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याने परिस्थिती अतिशय भीषण असल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्ते आणि हिंद संघटनेचे नेते बप्पादित्य बसू यांनी केला.
बसू म्हणाले, कट्टरपंथीयांकडून हिंदूंना धमकावले जात आहे. १८ दिवसांत सहा हिंदूंची हत्या करण्यात आली, मात्र आरोपी अजूनही मोकाट आहे. हिंदू नागरिकांना सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी आम्ही बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना पत्र पाठविले, पोलिस आणि प्रशासनाला निवेदने दिली. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही.
झेनाइदह जिल्ह्यातील कालीगंज परिसरात सोमवारी एका ४४ वर्षांच्या हिंदू विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात
आला. आरोपींनी बलात्कारानंतर तिला झाडाला बांधून मारहाण केली. यासंदर्भात तक्रार दाखल करूनही अद्याप पकडण्यात आलेले नाही. कट्टरवाद्यांच्या हौदोसाने हिंदू नागरिक कमालीचे दहशतीत आहे. हजारो लोक देश सोडण्याची तयारीत आहे, भारत सरकारने आरोपींना हस्तक्षेप करून हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना आश्रय देण्यासाठी पाऊले उचलावी अशी आमची मागणी आहे.
‘हिंदूंची हत्या ही एक किरकोळ घटना’
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते मिर्झा फखरूल इस्लाम यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. हिंदूंची हत्या या किरकोळ आणि क्षुल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदूंच्या हत्या म्हणजे माध्यमांनी मोठी केलेली प्रकरणे असल्याचे फखरूल इस्लामने म्हटले. या फक्त किरकोळ घटना आहेत. हिंसाचाराच्या घटना कोणत्याही एका समुदायापुरत्या मर्यादित नाहीत. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात मुस्लिमही सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला.
…तर बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्वच संपेल
बांगलादेश सरकारचे हिंदू नागरिकांसंदर्भातील धोरण कायम राहिल्यास आणि कट्टरपंथीयांचा उद्रेक असाच सुरू राहिल्यास काही वर्षांत बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्वच संपून जाईल. मोहम्मद युनूस यांचे सरकार हिंदूंच्या हत्येला पाठिंबा देत आहे. हिंदू नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि व्यावसायिकांना खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहे. पोलिस तक्रार केल्यास कुटुंबातील महिलांचे अपहरण करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे.
इंडिया आघाडीतील नेत्यांची दातखिळी
तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एन. रामचंद्र राव म्हणाले, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. संपूर्ण देश तेथील अल्पसंख्यकांच्या पाठीशी उभा असताना काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची याप्रकरणी दातखिळी बसली आहे. पॅलेस्टाईन, व्हेनेझुएलातील घटनांवर बोलतात, पण बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करायला ते तयार नाही, यातून त्यांची मानसिकता दिसून येते.









