घराच्या खोदकामात सापडल्या ऐतिहासिक 10 तोफा

 

तरुण भारत लाईव्ह । ९ जानेवारी २०२३। शहादा तालुक्यातील पाडळदा येथे अरुण हरी पाटील यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी मजूर खोदकाम करीत असताना 6 जानेवारी रोजी साधारणत: जमिनीत सहा ते सात फुटांवर पुरातन सुमारे 300 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक 10 तोफा सापडल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी हा विषय उजेडात आला.

अरुण हरी पाटील यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू होते. सुरेश अण्णा ठाकरे रा.सोनल- कवळीथ ता. शहादा खोदकाम करीत असतांना पहिल्यांदा अगोदर लोखंडाची काहीतरी वस्तू आहे असे वाटल्याने त्यांनी बाहेर काढली. मात्र नंतर एका पाठोपाठ 10 लहान मोठ्या वस्तू निघाल्या. मजूर सुरेश ठाकरे यांनी घरमालक अरुण पाटील यांना माहिती दिली. त्यांनी त्या वस्तू बघितल्या असता पुरातन तोफा असल्याचे निदर्शनास आले. गावात ही माहिती पसरल्याने ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. काही पाच फुटाच्या तर काही चार फुटाच्या तोफा आहेत. सर्व तोफा पंचधातूच्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी एक पितळाची आहे. पुढून गोलाकार अशी गोळा टाकण्यासाठी जागा असून मागच्या बाजूला बंदिस्त आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक संशोधनाचा विषय आहे. तोफा या नेमक्या किती वर्षाच्या पुरातन आहेत.राजवाडे संशोधन मंडळाने याचा शोध घ्यावा. मात्र ग्रामस्थांनी पुरातन वस्तू या गावाच्या इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी असल्याने गावातच ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.

तोफा इतिहासाच्या साक्षीदार…

पाडळदे हे जुने ऐतिहासिक गाव असून जुना इतिहास आहे. गावाच्या चारही बाजूने मोठी खंदक होती. गावात येण्या-जाण्यासाठी एकच दरवाजा होता. अहिल्याबाई होळकरांच्या काळातील दोन मोठ्या पाय विहिरीदेखील आहेत. इंग्रजांच्या विरोधात लढा देण्याच्या इतिहास या गावाला आहे. गावात स्वातंत्र्य सैनिक होते. जुन्या काळात गावाच्या संरक्षणासाठी या तोफांच्या वापर केला जात असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहादा तालुक्यात सुलतानपूर, फत्तेपूर, कोंढावळ या जुन्या ऐतिहासिक गावांमध्ये अद्यापही पुरातन वस्तू अधूनमधून सापडत असतात. त्यामुळे पाडळदे गावात सापडलेला या तोफा इतिहासाची साक्ष आहे. सापडलेल्या जुन्या तोफांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले नाही. मात्र चांगल्या स्थितीत आहेत. साधारणत: 10 तोफांचे वजन सहा क्विंटलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.

तलाठी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पूर्ण त्या तोफांचा पंचनामा करून वरिष्ठांना माहिती कळवली आहे. दरम्यान शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी देखील घरमालक अरुण पाटील यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली.
गावाला ऐतिहासिक परंपरा आहे. जुन्या काळात लोक आत्म संरक्षणासाठी किंवा गावाच्या संरक्षणासाठी शस्त्रांच्या वापर करत .इंग्रज काळात गावात अनेकांनी लढा दिल्याच्या इतिहास आहे. सापडलेला तोफा हा त्याच्यात ऐतिहासिक भाग आहे
– जगदीश पाटील, चेअरमन,
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पाडळदे, ता. शहादा

गावात ऐतिहासिक परंपरा असलेली पुरातन वस्तू सापडणे म्हणजे गावाला जुना इतिहास असल्याचा पुरावा आहे. एकप्रकारे गावाची ऐतिहासिक संपत्ती आहे.त्याची जपणूक करणे गरजेचे आहे.

– शरद पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता, शहादा