जळगाव : जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे अशातच आज पुन्हा एका घटना समोर आली आहे. ओव्हरटेक करताना ओमनी गाडीने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर रोडवर शेलकी वाकी फाट्याजवळ जामनेरकडे भरधाव वेगात ओमनी गाडी जात होती. तर अॅपेरिक्षा विरुद्ध दिशेने येत असताना आरोपी चालक त्याच्या पुढे चाललेल्या दुसऱ्या ओमनीला ओव्हरटेक करत होता. यावेळी ओव्हरटेकच्या नादात तो रस्त्याच्या चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या अॅपे रिक्षाला धडकला. रिक्षाला धडकल्याने रिक्षाचालक प्रदीप राठोड यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे रस्त्याच्या खाली पलटली.
रिक्षा पलटून रिक्षातील प्रवासी दादाराव सुरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील इतर सात प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ओमनी चालकाने पळ काढला. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अज्ञात ओमनी चालकाचा शोध घेत आहेत.