नवी दिल्ली : (Dr. Manmohan Singh) देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन दुखःद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आता मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मागणीनंतर केंद्र सरकारकडून मनमोहन सिंग यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने गृहमंत्रालयाच्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करून घेतले जावेत. त्यानंतर विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागेल. विश्वस्त मंडळ स्थापन करून मनमोहन सिंग यांचे स्मृतीस्थळ उभारले जाईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११:४५ वाजता दिल्लीतील निगमबोध घाटावर पूर्ण शायकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.