शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा मंगळवारी सन्मान सोहळा

 

जळगाव  : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा आंतरवासीता कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट डॉ. माधुरी कानिटकर हे ऑनलाईन उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली बॅच हि १०० प्रवेश क्षमतेची २०१८ साली प्रवेशित झाली होती. या तुकडीने ५ वर्षांचा अभ्यासक्रम आता पूर्ण केला आहे. त्यानंतर रुग्णालयात एक वर्ष या विद्यार्थ्यांनी आंतरवासीता प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांना विविध विषयांचे व विभागांचे विस्तृत मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणात त्यांनी रुग्णसेवा करताना लागणारे निपूण वैद्यकीय कौशल्य निष्णात प्राध्यापक वर्ग व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतले. ५ वर्षात विविध अनुभव त्यांना मिळाले. हे विद्यार्थी महाराष्ट्रसह देशभरातूनही होते.

विद्यार्थ्यांनी आंतरवासीता प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा मंगळवारी दि. १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या याकरिता गठीत करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला कुलगुरू लेफ्टनंट डॉ. माधुरी कानिटकर हे ऑनलाईन उपस्थिती देणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.