Accident : नववर्षाच्या पहाटे भीषण अपघात, ६ जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Accident :  संपूर्ण देशात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असताना, झारखंडमध्ये भल्यापहाटे एक भयानक घटना घडली. पिकनिकला निघालेल्या तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ६ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मृत तरुणांचे वय साधारण: २५ ते ३० दरम्यान असल्याचं कळतंय. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात  जमशेदपूर जिल्ह्यातील बिस्तुपूर परिसरात असलेल्या सर्किट हाऊस चौकाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

सर्व जखमींना जमशेदपूरच्या टाटा मुख्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छोटू यादव, हेमंत कुमार, सूरज कुमार, मोनू महतो, शुभम कुमार अशी मृतांची नावे आहेत. अन्य एकाची ओळख पटवणे सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत तरुण आदित्यपूर येथील बाबाकुटी आश्रम परिसरातील रहिवासी होते. नववर्षानिमित्त ते इंडिगो कारमधून पिकनिकसाठी निघाले होते. दरम्यान, त्यांची कार बिस्तुपूर येथील सर्किट हाऊस चौकाजवळ आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

क्षणार्धात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्कारचूर झाला या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राण सोडले. अजूनही दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.