Devendra Fadnavis : सोमनाथ सूर्यवंशीचा अचानक मृत्यू कसा झाला ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?

Devendra Fadnavis ।  परभणीतील संविधानाच्या अवमान प्रकरणानंतरच्या हिंसाचारात पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका झाली, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणावर भाष्य करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालांच्या आधारे स्पष्ट केले. तसेच, सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करत, या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सोमनाथ सूर्यवंशी हे कायद्याचे शिक्षण घेत होते आणि ते मूळ लातूरचे रहिवासी होते. परभणीतील जाळपोळ प्रकरणात त्यांचा समावेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत त्यांच्या प्रकृतीची पूर्णतः काळजी घेण्यात आली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

तसेच, न्यायाधीशांनी त्यांना मारहाण झाली का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी दोन्हीवेळा नकार दिल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अनेक शंका उपस्थित होत असल्याने न्यायालयीन चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केलं.