तरुण भारत लाईव्ह । आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. व्यस्त दिनचर्येमुळे लोक त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे जंक फूडचे सेवन वाढते. जंक फूडमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि इतर शारीरिक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार आणि काही विशेष पेयांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. एकूणच आरोग्यदायी पेये आणि खाद्यपदार्थ शरीराला उर्जा आणि पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरतात. आज आपण जाणून घेऊया की नेमके कोणते योग्य आहार आहेत.
नारळ पाणी : नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो अॅसिड असतात. हे घटक शरीराला आवश्यक पोषण देऊन उर्जावान ठेवतात. नारळ पाणी नियमित प्यायल्यास डिहायड्रेशनपासून संरक्षण मिळते आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात.
हेही वाचा : महाराष्ट्रातील घरमालकांसाठी ‘गुड न्यूज’, मंत्री जयकुमार गोरेंनी केली मोठी घोषणा
आवळा, बीट आणि गाजर ज्यूस
गाजरमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला पोषण देतात. बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट असते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. हे तीन घटक एकत्र करून ज्यूस तयार केल्यास शरीराला ताजेतवाने आणि उर्जावान ठेवता येते
ड्रायफ्रूट शेक : ड्रायफ्रूट शेकमध्ये असलेल्या नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. याशिवाय, बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. व्हिटॅमिन बी समृद्ध असलेल्या ड्रायफ्रूट्समुळे स्नायूंना उर्जा मिळते आणि शरीर सुदृढ राहते.
मिक्स फळांचा ज्यूस : मिक्स फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. हा ज्यूस प्यायल्याने शरीराला दिवसभरासाठी आवश्यक उर्जा मिळते.
ओट्स स्मूथी : ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने असतात. ओट्सचे सेवन केल्याने शरीरातील वजन संतुलित राहते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि उर्जावान वाटते. ओट्स स्मूथी हा एक उत्तम पर्याय आहे जो शरीराला सशक्त ठेवतो.