विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार ? शरद पवारांनी केले स्पष्ट

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २२५ जागा जिंकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटाचे सदस्यत्व घेतल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.  महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट बळकट करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले. चुकीचे काम करणाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते महाविकास आघाडीत सामील होत असल्याचे चित्र आहे. यापैकी मराठवाड्यातील दोन ते तीन नेत्यांनी भाजप सोडला आहे. माजी गृहमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, मी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा हिशेबही त्यांनी दिला.

शरद पवार म्हणाले, “”निवडणुकीनंतर कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर राष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आम्ही प्रचंड ताकद उभी करण्यास सुरुवात केली आहे, उदगीर आणि देवळाली येथून कार्यकर्ते येत आहेत, गेल्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून दिले होते. मतदारांनी मतदान केले, विधानसभेत पाठवले, पण आमदारांनी पाठिंबा सोडून वेगळी भूमिका घेतली, पण काही गोष्टी लोकांना आवडत नाहीत, असे शरद पवार म्हणाले. जे निवडून आले आहेत त्यांना योग्य तो धडा शिकवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.