सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः । सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्गभवेत् ।।
ही संस्कृतातील प्रार्थना! प्रत्येक जण आनंदी राहो, निरोगी राहो, सर्वत्र मंगलमय, आनंददायी होवो आणि कोणासही कुठलाही त्रास होऊ नये… अशी भावना समाज मनात वाढीस लागली तर साऱ्यांचेच कल्याण होईल. एक नवा समाज निर्माण होईल. त्यातून सक्षम, सुदृढ, संपन्न आणि समृद्ध देश निर्माण होईल.
अनेक व्यक्ती आजही अशा आहेत की, त्या दुसऱ्याचे दुःख, व्यथा व वेदना या आपल्या आहेत हे समजून त्याला मदत करतात. समाजावर आईसारखे प्रेम करतात..! समाजासाठी काहीतरी चांगले, उत्कृष्ट करण्याची ऊर्मी त्यांच्यात सतत जागृत असते. काय योजना आणाव्यात यासह लोकांसाठी उन्नतीचे, प्रगतीचे नवनवीन मार्ग ते शोधत असतात. आपल्या परिसराचा, भागाचा विकास कसा होईल, यासाठी झटत राहणे हेच आपले कार्य आहे या उद्देशाने हे लोक काम करतात. अशी उदाहरणे जेव्हा समोर येतात तेव्हा आपणास धन्यता वाटते. राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तत्र जेव्हा सारे काही विसरून समाजोन्नतीचा व्यासंग जोपासतात, समोरच्याला आपण काय देऊ शकतो, त्याच्या अडवर्णीवर कशी मात करता येईल यासाठीच झटत असतात… ते सन्मार्गी, सत्कर्मी, सत्पुरुष ठरतात. जनमानसात त्यांची वाहवा होते. त्यांच्याप्रति आदर निर्माण होतो. पण काही प्रसंग असे असतात की, ते पाहून वा ऐकून धक्काच बसतो. राजकीय क्षेत्रात काय परिस्थिती आहे हे आपण सर्व जण जाणतोच… आपण सत्तेत आहोत, आपले कोण काय बिघडवणार? आपण लोकप्रतिनिधी आहोत. काय होईल ते बघून घेऊ.. या भ्रमात वावरणारे, सत्तेच्या दंभात, गुर्मीत असणारे बरेच लोकप्रतिनिधी असतात.
मागच्या काही घटनांचे अवलोकन करू जाता… एक प्रसंग आठवतो. घटना तशी जुनी आहे. जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीवर युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई झाली होती. यात बरीच आदळ आपट झाली. चर्चा रंगल्या. बातम्या आल्या. मात्र काही काळाने तो गुन्हा मागे घेण्यात आला… तक्रार करणाऱ्या युवतीनेच तक्रार मागे घेतली. अशा तक्रारी अनेकांच्या बाबतीत झाल्या आहेत. मागे ठाण्यातील एका लोकप्रतिनिधीने तर चक्क पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या विरोधात काम करणाऱ्यावर गोळीबार केला होता. गैंगवॉरसारख्या प्रकारातून काही लोकप्रतिनिधींच्या हत्या झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधींवर भ्रष्टाचाराच्या तक्रारी ही तर नेहमीचीच, नित्याची बाब आहे. बरं हे प्रकार केवळ बिहारमध्येच होतात, असे नाही, तर आपल्या महाराष्ट्रातही घडते आहेत. घडत आहेत. लोकप्रतिनिधी कसा नसावा याची ही काही उदाहरणे झाली. तर लोकप्रतिनिधी कसा असावा याचीही काही उदाहरणे पाहू या.
समाजावर अगदी आईसारखे प्रेम करणारे काही लोकप्रतिनिधीही पाहायला मिळतात. आपल्या मतदारसंघातील जनतेच्या गरजा, त्यांच्या अडीअडचणी सोडविताना ते जिवाचे रान करतात. जसे केवळ जिल्हाच नव्हे, तर राज्यातील अनेक भागातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळवून देण्यात आपल्याच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा अनेक वेळा उल्लेख होतो. अपघात झाला… नैसर्गिक आपत्ती आली… कोणावर काही संकट आले तर त्या ठिकाणी प्रथम पोहोचण्याचे धाडस दाखविणारा लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांचा लौकिक आहे… आणि केवळ इतकेच नाही तर संबंधिताला शासकीय मदत मिळवून देणे, त्याच्या कुटुंबाचा, भवितव्याचा विचार करून जे जे चांगले करता येईल ते ते करण्याची तडफ, जिद्द गिरीश महाजन यांच्यात आहे. असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. कदाचित म्हणूनच त्यांना ‘संकट मोचक’ म्हणत असावेत.
नुकतीच शिरपूर येथे तेथील आमदार काशिराम पावरा यांची भेट झाली… लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार पावरा होत. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सतत झटणारे हे व्यक्तिमत्त्व. समाजकार्याला अध्यात्माची जोड देत त्यांचे या मतदारसंघातील कार्य खरोखर वाखाणण्याजोगे आहे… आणि त्यांना या कार्यात प्रोत्साहन देणारे, मार्गदर्शन करणारेच नव्हे तर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे ‘शिरपूर पॅटर्नचे’ उद्गाते, निर्माण करते, तो आदर्श देशभरात पोहोचविणारे ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल हे होत. आमदार पावरा हे खरोखर राजकारणातील आदर्श होत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समितीत सदस्य त्यानंतर आमदारकी लढवून तब्बल चार टर्म विजयी होणारे आमदार पावरा ग्रामपंचायत सरपंच असताना स्वच्छतेचा नारा देत हातात झाडू घेऊन स्वतः मैदानात उतरत एखाद्या ठिकाणी पाइप लाइन फुटली की कुदळ-टिकम हाती घेऊन स्वतः खड्डे खणून ग्रामस्थांना पाण्याची समस्या येऊ नये म्हणून खटाटोप करत. शिक्षण कमी पण आपला समाज शिक्षित कसा होईल, याचा ध्यास त्यांच्या मनी राहतो. ‘उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे‘ म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करून, कार्य सिद्धीस जात नाही, तर त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. जिद्द असावी लागते. मेहनत घ्यावी लागते.
आमदार पावरा यांचे कार्यालय म्हणजे मिनी मंत्रालयच. कुणाला कामासाठी मंत्रालयात जावे लागू नये… असे त्यांचे व अमरिशभाईंचे प्रयत्न असतात. सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांचा लवाजमा या कामासाठी तैनात असतो. सोबतीला सतत असतात तब्बल दीडशे संगणक आणि त्यावर निष्ठेने काम
करणारे संगणकीय तज्ज्ञ. आमदाराची मुले बँकेत नोकरीला आहेत. ती सायंकाळी इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करतात… मी आमदाराचा मुलगा, ही ओळख ही मुले कधीच सांगत नाहीत. प्रामाणिकपणाचे बाळकडू आपत्याला वडिलांनी दिले व आपण मुलांना तिच शिकवण देतो… असे पावरा सांगतात. रात्री शेतात स्वतः जाऊन पिकांना पाणी देणे हे त्यांचे नेहमीचे काम…. त्यानंतर सकाळी १० ते ११ कार्यालयातील समस्याग्रस्तांना मदत करणे, पत्नी तर रोज शेतात कामाला जाते… दुपारी घरी जाऊन जो स्वयंपाक केला असेल तेच जेवण करून पुन्हा समाजकार्यासाठी बाहेर पडणे हा आ. पावरा यांचा नित्यक्रम.
‘शिरपूर आमचे हृदय… ही भावना ठेवून ही मंडळी झटत असल्याने आज राज्यात आदर्श कार्याचा ठसा या तालुक्याने उमटविला आहे…. विकासाची पहाट याच पद्धतीने प्रत्येक मतदारसंघात उजाडावी बस हीच एक अपेक्षा….!
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व…
लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरपूरचे आमदार काशिराम पावरा होत. आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सतत झटणारे हे व्यक्तिमत्त्व. समाजकार्याला अध्यात्माची जोड देत त्यांचे या मतदारसंघातील कार्य खरोखर वाखाणण्याजोगे आहे… आणि त्यांना या कार्यात प्रोत्साहन देणारे, मार्गदर्शन करणारेच नव्हे तर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे ‘शिरपूर पॅटर्न’चे उद्गाते, निर्माण करते, तो आदर्श देशभरात पोहोचविणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आमदार अमरिशभाई पटेल हे होत. आमदार पावरा हे खरोखर राजकारणातील आदर्श होत. आमदार पावरा यांचे कार्यालय म्हणजे मिनी मंत्रालयच. कुणाला कामासाठी मंत्रालयात जावे लागू नये…. असे त्यांचे व अमरिशभाईंचे प्रयत्न असतात.