तरुण भारत लाईव्ह । २७ जानेवारी २०२३। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या १२ वीची परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये होणार आहे. यंदा महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली. हे हॉलतिकीट कोणत्या वेबसाईट वर पहायला मिळेल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होत असून परीक्षेसाठी लागणारे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध होत आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाईट वर हॉलतिकीट्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र घेऊन ठेवावे असे सांगण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.
www.mahahssscboard.in या वेबसाईट वर जाऊन १२ वीच्या परीक्षेचे ऑनलाईन हॉलतिकीट काढून घ्या. या प्रिंटवर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असं बोर्डाने सांगितलं आहे. तसेच हॉलतिकीट प्रिंट काढताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये हे देखील मंडळाने सांगितलं आहे. जर हॉलतिकिट मध्ये काही चुक असल्यास प्रवेशपत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन कराव्या.