इमर्जन्सी ब्रेक-प्लास्टिक कव्हर की लोको पायलटची चूक, का घडला रेल्वे अपघात ?

झारखंड : हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस (ट्रेन नंबर १२८१०) मुंबईकडे जात असतांना टाटानगरच्या जवळ असलेल्या सरायखेलामध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रेनचे पाच डबे रुळावरुन घसरले आहे. या अपघातात आतापर्यंत सहा जण जखमी झाल्याचें वृत्त असून अपघातस्थळी मदतकार्याला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे.

हावडा सीएसएमटी एक्सप्रेस ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार प्रदान केले जात आहेत. तसेच काही रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

ही मेल हावड्यावरून मुंबईला जात होती. रात्री ही मेल राजखरसावां जंक्शनमधून निघाली. सकाळी पावणेचारच्या सुमारास रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी सकाळी सव्वाचार वाजता एआरएमई रेल्वे घटनास्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी चक्रधरपूर रेल्वे रुग्णालय व खरसावनच्या शासकीय आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे.

काय आहे कारण ?
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणी मालगाडीच्या वॅगन्स आधीच उभ्या होत्या. त्या वॅगन्स पूर्णपणे प्लास्टिकने झाकलेल्या होत्या. जोरदार वाऱ्यामुळे अचानक वॅगनवरील प्लास्टिकचे आवरण उडून गेले. प्लास्टिकचे आवरण उडून हावडा-मुंबई मेलच्या इंजिनवर पडले. त्यामुळे हावडा-मुंबई मेलच्या इंजिनच्या काचा पूर्णपणे झाकल्या गेल्या. अचानक लोको पायलटसमोर अंधार पडला. ट्रेनच्या इंजिनमध्ये बसवण्यात आलेला बाह्य मुख्य दिवाही झाकलेला होता. लोको पायलटने तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावला आणि ट्रेन रुळावरून घसरली. त्यावेळी या ट्रेनचा वेग ताशी 30 किलोमीटर इतका होता.

ट्रेन तीन तास उशिराने धावत होती
चक्रधरपूर येथे अपघात झालेल्या मुंबई मेल एक्सप्रेस गाडी साडेतीन तास उशिराने धावत होती. ट्रेन क्रमांक 12810, ज्यामध्ये टाटानगरचा इंजिन क्रमांक 37077 जोडलेला होता. टाटानगर स्थानकातून पहाटे 2:39 वाजता, साडेतीन तास आणि मिनिटे उशिराने सुटली. टाटानगर स्थानकावर ट्रेन येण्याची वेळ 11.02 मिनिटे होती. अपघातात सहभागी झालेल्या ट्रेनच्या ड्रायव्हरला तीनदा बेस्ट ड्रायव्हरचा पुरस्कार मिळाला आहे. सकाळी झालेल्या अपघातानंतर ट्रेनचे लोको पायलट केव्हीएसएस राव, सहाय्यक लोको पायलट ए अन्सारी आणि गार्ड मोहम्मद. रेहानने तात्काळ नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. दक्षिण पूर्व रेल्वेच्या टाटानगर-चक्रधरपूर सेक्शनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.