मुंबई : कॅनडाच्या ब्रॅम्टन येथील हिंदू सभा मंदिरावर दिवाळीदरम्यान झालेल्या हिंसक हल्ल्याचा हिंदू स्वयंसेवक संघ यूएसएने तीव्र निषेध केला आहे. कॅनडातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबद्दल आणि मानवी हक्कांसाठी तसेच देशभरातील मंदिरांसह हिंदू समुदायाच्या मालकीच्या मालमत्तेच्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता एचएसएसने जारी केलेल्या पत्रकातून व्यक्त केली आहे. कॅनडातील कायदाव्यवस्था या घटनेप्रकरणी योग्य न्याय देईल आणि या हिंसक कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर निर्णायक कारवाई करेल, असा विश्वास एचएसएसने व्यक्त केला आहे.
न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामधील मंदिरांवर अलीकडेच झालेले हल्ले हे अधोरेखित करतात की ब्रॅम्प्टनमधील ही घटना एक वेगळी घटना नसून संपूर्ण उत्तर अमेरिकेतील हिंदूंना प्रभावित करणाऱ्या चिंताजनक प्रवृत्तीचा भाग आहे. अशा प्रकारच्या दहशतवादाच्या आणि द्वेषाने प्रेरित हिंसाचाराला राजकीय अभिव्यक्ती म्हणून न्याय्य ठरवता येणार नाही; ते मानवी हक्कांचे, विशेषत: धार्मिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांचे थेट उल्लंघन करतात आणि सामान्य लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतात
एचएसएसने माध्यमं, शिक्षक, विचारवंत आणि इन्फ्लुएन्लर यांना आवाहन केले आहे की, हिंदू समुदायाला लक्ष्य करणाऱ्या अतिरेक्यांच्या वाढत्या लाटेकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि अमेरिकन समाजाला असलेला धोका ओळखून सर्व प्रकारच्या द्वेष आणि धर्मांधतेचा निषेध करून शांततापूर्ण सहअस्तित्वावर आधारित संस्कृती वाढवण्याच्या दिशेने कार्य करण्याची आवश्यकता आहे.