पाऊणे दोन कोटींची अवैध दारू जप्त ; 226 गुन्हे दाखल; नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कारवाई

नंदुरबार : जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाणे हद्दीत छापा कारवाई करून दारुबंदीचे तब्बल 226 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच गुजरात राज्यात जाणारी सुमारे 1 कोटी 65 लाख 84 हजार 691 रुपये किमतीची देशी विदेशी दारू व वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहे.

गुजरात राज्यात दारूबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना नाकाबंदी करून अवैधरीत्या दारुची चोरटी वाहतूक करणार्‍या इसमांवर व वाहनांवर कारवाई करण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 17 ठिकाणी आंतरराज्य नाकाबंदी लावलेली आहे. त्याठिकाणी 14 पोलीस अधिकारी व 144 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी अधिकारी व अंमलदार यांचे पथक 24 तास कार्यान्वित केले आहेत. गुजरात राज्यात 1 व 5 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेच्या 182 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात जाणार्‍या वाहनांची पोलीस जवान त्या वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत शहादा-धडगाव रस्त्यावर एमएसईबी सबस्टेशन जवळ एका मागून एक असे तीन पिकअप वाहन येताना दिसले. त्यासाठी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने वाहन थांबविण्याचा इशारा दिला. परंतु तिन्ही वाहनचालकांनी वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेले. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही वाहनांचा पाठलाग करून थांबवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही वाहनाची पाहणी केली. त्यात 44 लाख 75 हजार 520 रुपये किमतीची विदेशी दारूरु, 18 लाख रुपये किमतीची दारुची अवैध वाहतूक करणारी तीन वाहने व 21 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त केले. तसेच धडगाव पोलीस ठाणे हद्दीतील शेलकुवी गावात रस्त्याच्या बाजूला एका आंब्याच्या झाडाखाली 1 लाख 5 हजार 120 रुपये किमतीची रॉयल ब्ल्यू व्हिस्की व 24 बिअर मिळून आली. तसेच 26 नोव्हेंबर रोजी नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कडकोट येथून गुजरात राज्यात खेकडा रोडवर करंजी गावाजवळ 1 लाख 17 हजार 600 रुपये किमतीची अवैध देशी दारू व 6 लाख रुपये किमतीची पांढर्‍या रंगाची मारुती सुझुकी अर्टीगा वाहन क्रमांक जीजे-03-जे-1510 असा एकूण 7 लाख 17 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शहादा पोलिसांनी या वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 19 लाख 80 हजार रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आल्याने वाहन चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाणे येथे दारुबंदी अधिनियम व जिवेठार मारण्याचा प्रयत्न करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे नंदुरबार पोलिसांतर्फे कारवाई

गुजरात विधानसभा निवडणूक अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येणार्‍या कारवाई तसेच उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी 25 रोजी जिल्हा घटकास भेट दिली. तसेच नाकाबंदीचे ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. नवापूर पोलीस ठाणे येथे भेट देवून अधिकारी व अंमलदार यांना निवडणूक अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.