हजारोंचा ऐवज असलेली पर्स महिला रिक्षात विसरली

तरुण भारत लाईव्ह न्यूज २९ नोव्हेंबर २०२२ । पैशाला सध्याच्या जगात माणसापेक्षाही जास्त किंमत आहे, त्यातच सोनं म्हटलं तर सख्खे भाऊ देखील त्यासाठी वैरी होऊन बसतात. मात्र, अद्यापही काही लोक आहेत, जे इतके प्रामाणिक आहेत की त्यांच्यासमोर हजारो रुपये असतील तरी ते त्या आमिषाला बळी पडत नाहीत. असंच एक उदाहरण जळगावमध्ये पहायला मिळालं. पर्समध्ये थोडं थोडकं नाही तर तब्ब्ल २ मोबाईल, १० हजार रोख, सोन्याचे दागिने असा ऐवज रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे त्या महिलेला परत केलं.

नाशिक येथील क्रांती नगरात राहणाऱ्या विमलबाई चंद्रकांत खैरनार या भाचीच्या लग्नासाठी भुसावळ येथे आल्या होत्या. भुसावळ येथून लग्न आटोपून विमलबाई दि.२८ रोजी सायंकाळी ट्रॅव्हल्सने अजिंठा चौफुली येथे उतरल्या. अजिंठा चौफुलीहून रिक्षा क्रमांक एमएच.१९.एई.७९९४ ने त्या बालाजी मंदिरजवळ भावाच्या घरी उतरल्या. घरी पोहचताच पर्स रिक्षात राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पर्समध्ये २ मोबाईल, १० हजार रोख, सोन्याचे दागिने असा ऐवज असल्याने विमलबाई घाबरल्या. स्वतःच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क केला असता कुणीही मोबाईल स्वीकारला नाही, त्यामुळे त्यांनी शनिपेठ पोलीस ठाणे गाठत पोलिसांना कळविले. पोलिसांनी देखील शोध घेतला परंतु चालक मिळून आला नाही.

मंगळवारी सकाळी रिक्षा साफसफाई करताना रिक्षा चालक अब्दुल रशीद अब्दुल कादर रा.सुप्रीम कॉलनी यांना पर्स आढळून आली. पर्समधून मोबाईल काढत त्यांनी अगोडर आलेल्या क्रमांकावर संपर्क साधत पर्स मिळाली असल्याचे कळविले. चालकाने शनिपेठ पोलीस ठाणे गाठून प्रामाणिकपणे पर्स महिलेला परत दिली. प्रसंगी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल विसपुते, मनोज इंद्रेकर, सुनील पवार, गिरीश पाटील, रविंद्र बोदवडे, मुकुंद गंगावणे यांनी पुष्पगुच्छ देऊन रिक्षा चालक अब्दुल रशीद अब्दुल कादर यांचा सत्कार केला. विमलबाई यांच्यासह परिवाराने देखील रिक्षा चालकाचे आभार मानले.