कृष्णराज पाटील
जळगाव- कोरोना संसर्ग प्रतिबंध काळात सर्वच सण,उत्सव, सामाजिक उपक्रमांसह मंदिरे, मंगल कार्यालये आदी ठिकाणी निर्बंध होते. त्यामुळे या काळात बाशिंगऐवजी मास्क आणि हळद लावण्याऐवजी सॅनिटायझर लावून ५ ते ७ जणांसह मोजक्याच उपस्थितीत लग्न लावण्याची वेळ अनेक नियोजित वधू-वरांवर आली होती. त्यामुळे गत दोन वर्षात आकडेवारी पहाता निबर्ंधकाळात २०२० मध्ये ४०५ तर यावर्षी २४५ आतापर्यत विवाह नोंदणी झाली असून खर्चिकऐवजी नोंदणी विवाहाकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
नोव्हेंबर दरम्यान तुलसीविवाहानंतर लग्नसराई सुरू झाली की विवाहेच्छुक उपवर वरवधूंच्या माता-पित्यांकडून मुलांचे विवाह करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. तशी लगबग ही एप्रिल महिन्यापासूनच सुरू होते. दिवाळीनंतर तसेच उन्हाळ्यात मुहूर्तावर तसेच नोंदणी विवाह मोठ्या प्रमाणावर होतात. तर नोंदणी विवाह करणार्यांमध्ये प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह करणार्या दांपत्यांचे प्रमाण त्यामानाने अधिक असते. तसेच, बरेचजण ‘ऍरेंज’नंतर देखील विवाह नोंदणीसाठी येत असल्याची माहिती नोंदणी विवाह कार्यालयातून देण्यात आली.
विवाहानंतर मुलीचे आधार कार्डवरील माहेरचे नाव बदलून सासरकडील नाव लावण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली जाते. तसेच शैक्षणिक कामांसाठी वा पासपोर्टसाठी देखील विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागितले जाते. काही ठिकाणी आपसात वैयक्तिक कारणास्तव वैवाहिक संबंध तुटल्यास घटस्फोटासाठी वकिलांकडून पुरावा म्हणून त्यांच्या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मागितले जाते. अशा विविध कामांसाठी विवाह होताच विवाह नोंदणी केली जाते. २०२१ मध्ये वर्षभरात ४५३ तर यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत २४५ विवाह नोंदणी झाली आहे. डिसेंबरसह आगामी काळात यात भर पडणार असल्याचे नोंदणी कार्यालय प्रशासनाने म्हटले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात पारंपारीक विवाहापेक्षा नोंदणी विवाहाकडे बर्याच जणांचा कल वाढला आहे. विवाह समारंभात वाजंत्री, बडेजाव, मानपानासह अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा भविष्यासाठी तरतूद करणार्या नवदाम्पत्त्यांची संख्याही वाढत आहे. कमी खर्चासह नोंदणी विवाह प्रक्रिया सोपी सुटसुटित आहे. यामुळे अनेक नववधू-वर यांच्याकडून नोंदणी विवाहास प्राधान्य दिले जात आहे.
– उमेश शिंदे,
सह जिल्हा निबंधक वर्ग १, जळगाव
तीन वर्षात आकडेवारी दृष्टीक्षेपात
वर्ष नोंदणी विवाह संख्या
एप्रिल २०२०- मार्च २०२१ ४०५
एप्रिल २०२१- मार्च २०२२ ४५३
एप्रिल २०२२ ते आजपर्यंत २४५