सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर ; येत्या दोन दिवसात जळगावात दाखल होणार

तरुण भारत लाईव्ह न्यूज : शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी झालेल्या कामकाजानंतर नियमित जामीन मंजूर झाला आहे. या संदर्भातील वृत्तास सुरेशदादा जैन यांनीही दुजोरा दिला असून येत्या दोन-तीन दिवसात जळगावी येऊ असे त्यांनी सांगितले.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती. यात काही नगरसेवक, माजी नगराध्यक्षांचाही समावेश होता. मात्र न्यायालयाने ठोठावलेला दंड भरल्यानंतर काही जणांची सुटका झाली.

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादा जैन यांना अटक झाली होती. या घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर ते जवळपास साडेचार वर्षे तुरुंगात होते. दरम्यानच्या काळात सुरेशदादांना सप्टेंबर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणे लक्षात घेऊन त्यांना जामीन दिला होता. पण त्यात न्यायालयाने सुरेशदादा यांना मुंबईत राहण्याची अट घातली होती. जळगावात येण्यास त्यांना प्रतिबंध घालण्यात आला होता.

उच्च न्यायालयात झाले कामकाज

सुरेशदादा जैन यांनी घरकुल घोटाळ्यात आपल्याला नियमित जामीन मिळावा, यासाठी सुरेशदादा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्यावतीने अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी न्यायालयात बाजू मांडली. अखेर उच्च न्यायालयाने सुरेशदादांना नियमित जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांचा जळगावात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरेशदादा जैन यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी वृत्तास दुजोरा देत दोन ते तीन दिवसात जळगावी येत असल्याचे सांगितले.

जळगावात समर्थकांकडून जल्लोष

सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मंजूर होताच जळगावात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून जल्लोष करण्यात आला. शहरातील गोलाणी मार्केट समोरील परिसरात शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी महापौर जयश्री महाजन, महानगर जिल्हाध्यक्ष शरद तायडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.