तरुण भारत लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । राज्यातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस हुडहुडी वाढणार असून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात देखील २३ ते २७ डिसेंबरदरम्यान, थंडीची तीव्रता अधिक जाणवू शकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उर्वरित महाराष्ट्रात थंडीची तीव्रता काहीशी कमी जाणवेल, मध्य महाराष्ट्रात सध्या १३ ते १७ अंशांदरम्यान किमान तापमानाची नोंद होत आहे. जळगाव, महाबळेश्वर येथे मंगळवारी किमान तापमान सोमवारपेक्षा अधिक होते. मराठवाड्यामध्येही औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी १३ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान किमान तापमानाची मंगळवारी नोंद झाली.
तसेच तापमानाचा पारा पुन्हा घसरणार असून डिसेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. काश्मीर खोरे, हिमाचलमधील अतिथंडी आणि बर्फवृष्टीमुळे पश्चिम राजस्थानच्या वायव्य दिशेकडून सह्याद्री आणि सातपुडा खिंडीतून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये यवतमाळमध्ये सरासरीहून किमान तापमान ३ अंशांनी कमी नोंदवले गेले आहे.