संतापजनक ! तिसरीही मुलगीच; हैवान पतीने पत्नीला संपवलं

#image_title

परभणी : माणुसकीला काळिमा फासणारी घटना परभणीच्या गंगाखेड नाका परिसरात घडली आहे. तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक काळे या व्यक्तीला तिसरी मुलगी झाल्यामुळे पत्नी मैना कुंडलिक काळे यांच्याशी सतत वाद व्हायचे. त्यातच तो तिला शिवीगाळ, मारहाण करत असे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास, रागाच्या भरात कुंडलिक काळे याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

घटनेनंतर पेटलेल्या अवस्थेत मैना काळे यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. यावेळी त्या दुकानात शिरल्याने दुकानासह घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसत असून, ती पाहून कोणाच्याही काळजाचा थरकाप उडेल.

जखमी अवस्थेत मैनाला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर भाजल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर संताप व्यक्त करणाऱ्या नागरिकांनी आरोपी कुंडलिक काळे याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या संतापजनक घटनेने महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. समाजात महिलांबद्दल असलेल्या अशा वागणुकीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.