उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती तिला मारहाण करत जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडतो. एवढेच नव्हे, तर त्याने तिच्या बेडरूममध्ये लपवून कॅमेरा बसवला होता. सर्वात धक्कादायक म्हणजे, तिचा पती इतर महिलांसोबत संबंध ठेवत असून त्यांचे व्हिडिओ शूट करून तिला पाठवत होता.
लग्नानंतर असा सुरु झाला अत्याचार
पीडित महिला कानपूरच्या स्वरूप नगर भागात राहते. तिचे लग्न ९ वर्षांपूर्वी रावतपूर येथे राहणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरसोबत झाले होते. विशेष म्हणजे, हे लग्न कानपूरमध्ये न करता नैनीतालच्या एका मंदिरात पार पडले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्यांनी सांगितले होते की कानपूरमध्ये लग्न केल्यास खूप खर्च येईल, त्यामुळे थोडे पैसे द्या आणि नैनीतालमध्ये कमी खर्चात लग्न करू. मात्र, लग्नानंतर लवकरच परिस्थिती बदलली. पती आणि दीराने वारंवार पैशाची मागणी करत तिच्यावर अत्याचार सुरू केले.
हेही वाच : घरात लहान भावाचा तिलक समारंभ सुरू अन् मोठ्या भावाने घेतला गळफास; कारण ऐकून सर्वच थक्क
गुप्त कॅमेऱ्याचा धक्कादायक खुलासा
पीडितेच्या आरोपानुसार, तिचा पती मद्यपान करून घरी परतायचा आणि जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवायचा. समाजाच्या भीतीने आणि लग्न टिकवण्यासाठी ती हे सर्व सहन करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तिला कळाले की तिच्या बेडरूममध्ये गुप्त कॅमेरा लावण्यात आला आहे. जेव्हा तिने याला विरोध केला, तेव्हा पतीने तिला पुन्हा मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
पतीच्या अनेक महिलांसोबत संबंध
महिलेच्या आरोपानुसार, तिच्या पतीचे अनेक महिलांसोबत असलेले संबंध तो उघडपणे स्वीकार करायचा. इतकेच नव्हे, तर तो त्या महिलांसोबतचे खासगी क्षण व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून पत्नीला पाठवत असायचा. यानंतर तिला आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली कि, तिच्या पतीचे आधीच लग्न झाले होते, परंतु सत्य परिस्थिती लपवून तिला फसवून लग्नात अडकवले. ही माहिती तिला नंतर समजली.
पती आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
महिलेने स्वरूप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तिच्या पती आणि दीराविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिस अधिकाऱ्यांनी लवकरच कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
ही घटना समाजातील भयावह वास्तव दर्शवते, जिथे लग्नासारख्या नात्यात महिलांवर होणारे अत्याचार अद्यापही सुरूच आहेत. पोलिस तपासानंतरच आरोपींवर पुढील कारवाई होणार आहे.