तिच्यामुळे आज मी आई आहे…

मध्यंतरी एक चित्र प्रदर्शन पाहण्याचा योग आला. रंगरेषांची भाषा फारशी समजत नसली तरी सगळीच चित्रे अतिशय आकर्षक आणि सुरेख होती. प्रदर्शन बघता बघता लक्ष गेलं खुर्चीवर बसून पायाने चित्र काढणार्या एका मुलीकडे. तिच्याभोवती पाच-सहा कॉलेज कन्यका आश्चर्याने बघत होत्या. मीही जाऊन उभी राहिले आणि बघतच राहिले. तिने नदीवरून कमरेवर आणि डोक्यावर भरलेली घागर घेऊन येणार्या स्त्रिचे चित्र काढले होते.

चित्रात त्या स्त्रिचा थोडा थकलेला पण समाधानाचं हसू असलेला निर्मळ चेहरा इतका सुरेख काढला होता की, क्षणभर ती माझ्याशी बोलत आहे, असा भास झाला. हुबेहूब प्रसंग साकारण्याचं कसब तिच्या पायात होते.

कारण तिला हात नव्हतेच. खूप वाईट वाटलं. ती मात्र तिच्या तालात, रंगात चित्र रंगवत होती.
कुठलाही नैराशाचा भाव किंवा खंत तिला नव्हती. जणू आहे ती परिस्थिती तिने स्वीकारून जे परमेश्वराने बहाल केले त्यात आनंदी दिसत होती. मी मात्र अस्वस्थ मनाने घरी आले.
सरावाने कामे सुरू होती. पण मनात मात्र एकेक विचारांचं काहूर माजलं होतं. कारण खूप वर्षांपूर्वीचा तो प्रसंग जसाचा तसा उभा राहिला. किंबहुना अनेक वेळा तो तसा दिसतो. एकदा संध्याकाळी मी मुलीला घेऊन बागेत गेले होते. सगळीकडे उत्साही, प्रसन्न वातावरण होते. सगळीकडे बागडणारी मुले, त्यांचे कौतुक बघण्यात, त्यांच्याशी खेळण्यात रमलेले आई-बाबा. कुणी झोका तर कुणी घसरगुंडी खेळतोय, कुणी मस्त भेळ खातंय तर कुणी कुल्फी खात खात या सार्याचा आनंद घेतोय. अशा सर्व किलबिलाटात पूर्ण बगीचा फिरूया म्हणून थोडी पुढे गेले तर गोल फिरणार्या खेळण्याकडे लक्ष गेले.

छोटी मुले त्या खेळण्याला पक्के धरून गोल गोल फिरून आनंद घेत होती. पण त्यातील एक सहा-सात वर्षाची मुलगी मात्र घाबरून ओरडत होती. तिच्या ओरडण्याने सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे जात होते. ती मुलगी दिव्यांग होती. बुद्धीने पण मंद वाटत होती. तिला चालताही येत नव्हते. तिला पाहून खूप गलबलून आले. क्षणार्धात मूडच गेला. तिला सांभाळणारी बाई रविवार म्हणून तिला घेऊन आली होती. तिची आई पण होती. पण काही वेळाने त्या मुलीची आई तिचे भराभर मुके घेऊन पटकन निघून गेली. तिची आई गेल्यावर सहज त्या सांभाळणार्या बाईशी बोलले, तर तिने सांगितले, या मुलीचे बाबा आजारी असतात आणि घरात वर्षांचे सासरे आहेत. हिच्या आईला नोकरी करावीच लागते. हिला कोण सांभाळणार? मग मीच तिला सांभाळते.
मला पगारही चांगला देतात. तिच्या आई-वडिलांचे तिच्यावर खूप प्रेम आहे. तिची आई तर म्हणते, माझी मुलगी कशीही असली तरी आज तिच्यामुळे मी आई आहे. काळजावर दगड ठेवून ती माऊली संसाराचा गाडा ओढत आहे. हे असं चित्र पाहून वाटतं, जगात कितीतरी दुःख असतात माणसांची आणि आपण आपलं दुःख मोठं करून जगत असतो.

                                                                                                                                                                                                                      विशाखा देशमुख                                                                                                                                                                                                                                            ९३२५३५३१९८