माझ्या नशिबात असेल तर होईल मी मुख्यमंत्री !

पंढरपूर : माझ्या नशिबात असेल तर मी मुख्यमंत्री होईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आषाढी एकादशीनिमित्त ते पंढपूरच्या वारीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ‘भावी मुख्यमंत्री’ असे नाव असणारी वीणा भेट दिली. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नाना पटोले म्हणाले की, “इथल्या कार्यकर्त्यांनी मला वीणा भेट दिली आहे. त्यांनी फेटाही बांधून दिला. मी विलासराव देशमुखांचा शिष्य आहे. वेळेच्या आधी नशीबापेक्षा जास्त काहीच मिळत नाही असं ते सांगायचे. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “माझा महाराष्ट्र आज पेटतो आहे तो मला शांत करायचा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील आणि विलासराव देशमुखांच्या काळातला महाराष्ट्र आम्हाला पुन्हा उभा करायचा आहे. माझी लढाई जनतेसाठी आहे, ती खुर्चीसाठी राहिलेली नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि इथल्या जनतेच्या विकासासाठी माझी लढाई आहे आणि ती लढत राहील,” असेही ते म्हणाले. तसेच राहूल गांधींना आम्ही वारीमध्ये येण्याची विनंती केली होती. ते बाहेर असल्याने येऊ शकले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.