भविष्यात पक्षाने जबाबदारी दिल्यास नक्की स्विकारणार : रोहित निकम

जळगाव : मी राजकारणात आल्यापासून पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अगोदर दूध संघ ६.५ कोटी तोट्यात होता. दूध संघ वर्षभरात नफ्यात आला. राज्य मार्केटिंग फेडरेशनपदी निवड झाल्यापासून मोठे उद्दिष्ट गाठत आहे. राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून देखील खूप काही गाठायचे आहे. लोकसभेला माझ्या नावाची चर्चा होती मात्र संधी मिळाली नाही. पण प्रामाणिकपणे काम केले. भविष्यात पक्षाने जबाबदारी दिल्यास नक्की स्विकारणार असे रोहित निकम यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी ज्वारी खरेदीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, जग तंत्रज्ञानावार चालत आहे. जळगाव शहरात तरूणांसाठी रोजगार निर्मिती करुन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. केवळ रस्ते, गटारी म्हणजे विकास नव्हे. ग्रीन जळगाव अंतर्गत ५ वर्षात ५ लाख वृक्षारोपण करण्याची गरज आहे. काही संस्थांच्या माध्यमातून तो उपक्रम राबवायचा आहे, असे ते म्हणाले.

शहरासाठी जळगाव व्हर्जन २.० आणणे गरजेचे आहे. पुणे, मुंबई जाणाऱ्या तरुणांना रोजगार इथेच उपलब्ध करून द्यायला हवा. माझ्याकडे जिल्ह्याच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे. विद्यमान आमदारांनी देखील त्यांच्या परीने काम केले असल्याचे रोहित निकम म्हणाले.

जिल्ह्यासाठी ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढले
जळगाव जिल्हयात १८ खरेदी केंद्र ज्वारी खरेदीसाठी कार्यरत आहेत. जिल्ह्यात एकुण ५ हजार ३२७ शेतकऱ्यांनी नोंदनी केलेली आहे. ३१ जुलै अखेर २ हजार ४१५ शेतकऱ्याकडुन ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. ज्वारी खरेदीसाठी जिल्हयाकरीता एकुण ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट प्राप्त झाले होते. व त्याची मुदत ३१ जुलै होती. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आनिल पाटील आणि महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहीत निकम यांच्या अथक प्रयत्नामुळे तसेच राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडील पाठपुरावामुळे जिल्ह्याला वाढीव उद्दिष्ट ९५ हजार क्विंटल मिळाले आहे.

शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी आणावे
ज्वारी खरेदीची मुदत संपली होती. त्यास केंद्र शासनाकडून ३१ ऑगस्टपर्यंत विशेष परवानगी मिळाली आहे. ज्वारीच्या विषयासाठी आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे, जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांचे देखील सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुक्यातील केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले