अवैध डिझेल टोळी : भारतीय तटरक्षक दलाने तीन दिवसांत पकडले 55 हजार लिटर डिझेल

नवी दिल्ली : समुद्रात अवैध डिझेलची तस्करी वाढत आहे. अवैध डिझेल टोळीविरोधात भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे. तीन दिवसांत सुमारे 55 हजार लिटर अवैध डिझेल जप्त करण्यात आले आहे. 16 मे रोजी तटरक्षक दलाने ‘जय मल्हार’ नावाच्या मासेमारी जहाजातून काही अमली पदार्थांसह एकूण 25 हजार लिटर अवैध डिझेल जप्त केले.

२७ लाख रुपयांचे डिझेल केले जप्त 
तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई बंदरात नेण्यात येत आहे. जप्त केलेल्या 25 हजार लिटर डिझेलची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे. पकडलेल्या लोकांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, त्यांनी ५ हजार लिटर डिझेल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींना विकले होते.

मासेमारी बोटीद्वारे डिझेलची विक्री 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अवैध डिझेल टोळी एका जाळ्यासारखी पसरली आहे. समुद्रातून जाणाऱ्या लहान-मोठ्या जहाजांच्या माध्यमातून तस्करी होते आणि हे अवैध डिझेल सध्या समुद्रात असलेल्या मासेमारी नौकांना विकले जाते आणि तेथे ते पूर्णपणे विकले गेले नाही तर ते समुद्रकिनाऱ्यालगतच्या मच्छीमार वस्तीत विकले जाते. हजारो लिटर तेल सहज ठेवता येईल आणि लपवून ठेवता येईल, अशा पद्धतीने तस्करांनी बोटीत बदल केले आहेत.