भुसावळातील किन्ही एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर इंधन साठा जप्त

---Advertisement---

 

भुसावळ तालुक्यातील किन्ही–शिरपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीवर भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा उघडकीस आणला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील इंधन भेसळ आणि तेल माफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक F-50/51 येथील ‘नमो एनर्जी ऑईल’ कंपनीत काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. कंपनीच्या आवारात एक टँकर उभा असून त्यात डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ साठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ही माहिती मिळताच तहसीलदारांच्या आदेशानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे व त्यांच्या पथकाने रविवारी पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला.

छाप्यादरम्यान GJ 24 V 7655 क्रमांकाचा टँकर कंपनीच्या आवारात उभा असल्याचे आढळून आले. तपासणी केली असता टँकरमध्ये सुमारे ३० हजार लिटर बायोडिझेलसदृश द्रव साठवलेला होता. संबंधित द्रवाची घनता ७१२ इतकी नोंदवण्यात आली असून तापमान २० अंश सेल्सिअस होते. हा पदार्थ नेमका बायोडिझेल आहे की अन्य कोणते इंधन, याची खात्री करण्यासाठी नमुने घेऊन रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कारवाईदरम्यान कंपनी मालकांच्या नातेवाइकांनी सदर टँकर भाडेतत्त्वावर घेतल्याचा दावा केला. मात्र, छापा टाकण्यात आला त्या वेळी टँकरचा चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणात सुमारे १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि ७० रुपये प्रतिलिटर दराने अंदाजे २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन असा एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला टँकर पुढील तपासासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हलवण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---