नंदुरबार : झोपडीतून अवैध दारू जप्त करण्यात आली. धडगाव तालुक्यातील खुंटामोडीचा पितीपाडा येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा लाख २४ हजारांचा दारू साठा जप्त करण्यात आला. मात्र पोलीस येताच संशयित पसार झाल्याची माहिती नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.
नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांना धडगाव येथील खुंटामोडीचा पितीपाडा येथे रस्त्याच्या कडेला एका झोपडीत मद्यसाठा उतरवण्यात आल्याची माहिती मिळाली होती व संशयित चोरट्या पद्धतीने मद्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला निर्देश दिले. पोलीस पथकाने ७ रोजी छापेमारी केली. या वेळी दोघा संशयितांना ओळखण्यात आले. मात्र पोलीस येताच ते पसार झाले.
पोलिसांनी याप्रकरणी राहुल मानसिंग तडवी (रा. भगदरी), उमेदसिंग गोविंदसिंग पाडवी (काठीचा निंबीपाडा), लक्ष्मण विक्रम पाडवी (काठी, ता. अक्कलकुवा), शिवदास ऊर्फ भाया कुवरसिंग पाडवी (रोझवा, ता. तळोदा), वसंत किरमा वळवी (खुंटामोडीचा पितीपाडा, ता. धडगाव), नागेश दमण्या वळवी (कात्री, ता. धडगाव) यांच्याविरोधात धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, दीपक न्हावी, अभिमन्यू गावित व धडगाव पोलिसांनी केली.