---Advertisement---
भुसावळ( प्रतिनिधी) : वरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पेट्रोल पंपासमोर अवैधरीत्या वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. इंधन भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या पेट्रोल पंपासमोर दुरुस्तीकरिता ठेवलेली तसेच खासगी वाहने कायमस्वरूपी उभी असतात. यामुळे पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
पावसाळ्यात काही पंपाच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.इंधन भरताना पावसाचे पाणी गळत असल्याने ग्राहकांना गैरसोय आणि अस्वस्थता जाणवते.पेट्रोल पंप ही अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहकांची सुरक्षितता व सुविधा सुनिश्चित करणे ही पंप मालकाची जबाबदारी आहे,असे नागरिकांनी सांगितले.
ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे या पंपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.दररोज जीव मुठीत घेऊन पंपावर यावे लागते.प्रशासनाने आता तरी लक्ष घालून अवैध वाहनांवर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









