उंबरखेड्यात तांदळाचा अवैध साठा पकडला

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडे येथे काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करून ठेवलेला सुमारे ६ लाख ७० हजार ९५० रूपये किमतीच्या ७२९ गोण्या रेशनचा तांदूळ महसूल व पोलिसांच्या पथकाने पकडला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांत दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक असल्याने छापा टाकल्यानंतर पुढील कारवाई उशिराने करण्यात आली.

पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून गोदाममालक पप्पू वाणी व ट्रकचालक अशा दोघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील उंबरखेडे येथे १५ डिसेंबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास चाळीसगाव विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली, की उंबरखेड ते आडगाव रस्त्यालगत नीलेश ऊर्फ पप्पू सुरेश वाणी यांच्या गोदामात बेकायदेशिररीत्या शासकीय वितरण प्रणालीचा तांदूळ भरून खुल्या बाजारात विक्रीसाठी ट्रकमधून या ट्रकमध्ये घेऊन जात आहे.

या माहितीची खात्री करून कारवाईसाठी श्री. देशमुख यांच्यासह तहसीलदार अमोल मोरे, पुरवठा अधिकारी राजेंद्र ढोले, तलाठी दिनेश येडे, तलाठी रवींद्र ननवरे, वाहनचालक मिर्झा तसेच सहाय्यक फौजदार भाऊसाहेब पाटील, पोलिस कर्मचारी अमोल पाटील, वाहनचालक गणेश नेटके, मेहुणबारे ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, नीलेश लोहार व चालक हवालदार संजय पाटील व दोन पंच यांच्या पथकाने नीलेश वाणी याच्या गोदामात शुक्रवारी (ता.१६) रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता गोदामाच्या बाहेर ट्रक (एमएच १८ एसी १९११) ट्रक उभा होता.

या ट्रकचा चालक पथकाला पाहून अंधारात शेतामध्ये पळून गेला तर ट्रकजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीस त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने नीलेश ऊर्फ पप्पू सुरेश वाणी (रा.उंबरखेड) असे सांगितले व गोदाम माझे असल्याचे व ट्रकमध्ये आपल्या गोदामातील तांदळाच्या कणीचा माल असल्याचे सांगितले. या ट्रकमध्ये मागील बाजूस बांधलेली ताडपत्री व दोर सोडून बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता या गोण्यांमध्ये अखंड व किरकोळ तुकडा असलेला तांदूळ भरलेला असल्याची खात्री झाली. ट्रकचालकाचे नाव रफीक शहा गफूर शहा असे असल्याचे नीलेश वाणी यांच्याकडून समजले.

घटनेचा पंचनामा करून सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या ताब्यात ट्रक देऊन मेहुणबारे पोलिस ठाणे आवारात ठेवण्यात आला होता. या ट्रकमध्ये पांढऱ्या प्लास्टिकच्या विविध गोण्यांमध्ये २५ हजार ३५५ किलोग्रॅम वजनाचा स्वस्त धान्य दुकानात विक्रीचा तांदूळ आढळून आला. हा माल जप्त करून सील करण्यात आला.

त्यानंतर पुरवठा निरीक्षक राजेंद्र ढोले यांनी खात्री करून नमुने तपासणी करून पंचनामा व अहवाल तयार करून ट्रकमध्ये आढळून आलेला ४ लाख ५६ हजार ३९० रुपयांचा तांदूळ तसेच गोदामातील २ लाख १४ हजार ५६० रूपये किंमतीचा तांदूळ असा ६ लाख ७० हजार ९५० रुपये किमतीचा काळ्याबाजारात जाणारा रेशनचा तांदूळ, तसेच ९ लाख ५० हजार रूपये किमतीची ट्रक असा एकूण १६ लाख २९ हजार ९० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील संशयित नीलेश उर्फ पप्पू सुरेश वाणी व रफिक शहा गफ्फूर शहा (चालक) (दोन्हा रा. उंबरखेड) यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पुरवठा निरीक्षक राजेंद्र ढोले यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके तपास करीत आहेत.