आमलाणला अवैध सागवान लाकूड जप्त

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ । नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील आमलाण येथे वनविभागाच्या पथकाने दोन लाख रुपये किमतीचे बेवारस अवैधरित्या लाकूड जप्त केले आहे. सदरचा माल शासकीय वाहनाने व जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर मध्ये भरून शासकीय विक्री आधार नवापूर येथे जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीवरून सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, रेंज स्टाफ चिंचपाडा व नंदुरबार स्टाफ व नवापूर स्टाफ यांच्यासह आमलाण (कोकणी पाडा) येथे जावून तपास केला. रस्त्याच्या बाजूच्या शेतात शोध घेतला असता बेवारस अवैधरित्या साग चौपट-३ घ.मी-०.४०५ व हलदू गोल नग-४ घ.मी-२.२४७ माल लपवलेला मिळून आला. सदर मालाचे एकूण घ.मी-२.६५२ मालाची किंमत अंदाजे २ लाख आहे.

दरम्यान, सदर माल जप्त करून सदरचा माल शासकीय वाहनाने व जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर मध्ये भरून शासकीय विक्री आधार नवापूर येथे जमा केला. पुढील तपास वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी करीत आहेत.

वनसंरक्षक विवेक होशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वनाधिकारी दक्षता संजय पाटील, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  वनपाल युवराज भाबड, वनरक्षक भूपेश तांबोळी, लक्ष्मण पवार, अनिल वळवी, कल्पेश अहिरे, रामदास पावरा, सतीश पदमर, ईलान गावित, तुषार नांद्रे, वनमजूर बाळा गावित, जेऊ गावित, दिलीप गावित, सुदाम गावित, पांडू गावित, वाहन चालक दीपक विभांडीक, रवी गिरासे यांनी ही कारवाई केली.