गौणखनिजाची अवैध वाहतुक : २२७ दंडात्मक कारवाया ; केवळ ९८ लाख जमा, २ कोटी थकीत

जळगाव : शासनाच्या गौणखनिज तसेच वाळू निर्गती धोरणास अनुसरून वाळू गटांचे लिलाव झाले. परंतु या प्रक्रियेला ठेकेदारांनी अल्प प्रतिसाद दिला असून, मोजक्याच वाळू गटांचे ई ऑक्शन लिलाव झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी नाले पात्रांतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून अवैध तसेच गौणखनिज वाहतूक प्रकरणी आतापर्यंत २२७ कारवाया करीत ३ कोटी ९ लाखांहून अधिक रकम दंडापोटी वसूल केली आहे. यात २ कोटी रूपये दंडात्मक रकम शासन तिजोरीत जमा झाली असल्याचे गौणखनिज प्रशासनाने म्हटले आहे. ई-ऑक्शन प्रक्रियेला थंड प्रतिसाद २०१८-१९ नंतर शासनाच्या वाळू निर्गती धोरणाला विलंब झाल्याने अनेक ठिकाणी वाळू गटांचे ई ऑक्शन लिलाव लांबणीवर पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी उशीराने झालेल्या ई ऑक्शन लिलाव प्रक्रियेत वाळू ठेकेदारांनी फारसा प्रतिसाद न दाखवता जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांतून जाणाऱ्या गिरणा तसेच अमळनेर, चोपडा, धरणगाव, पारोळा, मुक्ताईनगर, रावेर आदी अन्य तालुका परिसरातून तापी,अंजनी, वाघूर तसेच लहान मोठ्या नदी नाले पात्रातून वाळूचा अवैध प्रमाणात मोठा उपसा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून एकीकडे अवैध वाळू वाहतूक प्रकरणी वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू असताना ई ऑक्शन लिलाव होऊनही रात्रीच्याच वेळी मोठ्या प्रम  ाणात अवैध वाळू तसेच गौणखनिज वाहतूक होत असल्याने प्रशासनही हतबल बनले आहे.

सातत्याने कारवाया तरीही वाळू वाहतूक सुरूच
जिल्हा प्रशासनाने तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या स्थानिक स्तरावरील नियुक्त पथकाने सातत्याने कारवाया करूनही वाळूतस्करांची म  ोहीम मोडीत निघालेली नाही.

विशेष सुरक्षा दल पथक नियुक्तीसाठीचा प्रस्ताव थंड बस्त्यात
अवैध वाळू वाहतूकीसंदर्भात धडक कारवाईसाठी स्थानिक स्तरावर तैनात असलेल्या पथकांवर वाळू वाहतूकदार व वाहनचालकांकडून हल्लेही करण्यात आले आहेत. त्यामुळे महसुली अधिकाऱ्यांनी या कारवायांसाठी विशेष सुरक्षा दलाचे पथक तैनात करण्यासह संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांची वाट अजूनही मोकळीच असल्याचे चित्र दिसून येत जळगाव १ आणि चाळीसगाव तालुक्यात २ गुन्ह्यांची नोंद दरम्यान, गेल्या तीन चार महिन्यात अवैध गौण खनिज वा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जळगाव ६४ व चाळीसगाव ४१ कारवाया करण्यात आल्या आहेत. अन्य कोणत्याही तालुक्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जळगावमध्ये एक तर चाळीसगावमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. त्यात दोन्ही तालुक्यांतील प्रत्येकी दोन आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

३ कोटीपैकी २ कोटी रूपये दंड थकीत
जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू गौण खनिज उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करीत शेतीकामासाठी व शेतमाल वाहतूकीसाठी उपयोगात येणारे ट्रॅक्टर ट्रॉली, हायवा ट्रक, डंपर, छोटे वाहने असे २०० च्यावर वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात आतापर्यंत सर्वात जास्त ३ कोटी ९ लाख १ हजार २९४ रुपयांचा दंड अवैध वाळू गौण खनिज वाहतूकीपोटी आकारण्यात आला आहे. त्यातील ९८ लाख ४८ हजार ९०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्या तुलनेत २ कोटी १० लाख ५२ हजार ३९८ रुपयांचा दंडाची वसुली झाली नसल्याचे स्पष्ट आहे.

दंड भरल्यानंतर सोडली वाहने
जळगाव ६४, जामनेर ५. एरंडोल ८, धरणगाव १२, पारोळा ३. भुसावळ १२, बोदवड १, मुक्ताईनगर १. यावल १७, रावेर १३, अमळनेर ८, चोपडा ७, पाचोरा १६, भडगाव १९, चाळीसगाव ४१ अशा प्रकारच्या सुमारे २२७ अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक संदर्भात नोंदविण्यात आल्या असून कारवाई पोटी जप्त वाहने विविध तालुकास्तरावरील तसेच जिल्हाधिकारी कार्यालन प्रशासकिय इमारत आवारात जमा करण्यात आली असून ज्या वाहनांच्या मालकांनी दंड रकमेचा भरणा केला आहे. त्यांची वाहने सोडविण्यात आली असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक कारवाईत सातत्य ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या कारवाईत जप्त वाहनांसह वाहतूकदार संबंधीत मालकांच्या मालमत्तांवर देखील जप्तीची कारवाई करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी