तरुण भारत लाईव्ह । जळगाव : उकाड्याने हैराण आलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागात आगामी दोन दिवस गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर आज शनिवारी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या तीन चार दिवसात घटलेल्या तापमानात पुन्हा वाढ झाल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे. सध्या जिल्ह्यातील तापमान ४३ अंश सेल्सिअसवर जात आहे. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसत आहे. दुपारी तर सूर्यनारायण आग ओकत आहे.
यातून जळगावकर होरपळून निघत आहे. उकाड्यापासून कधी दिलासा मिळेल याकडे लक्ष लागले आहे. अशातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे
आगामी दोन दिवस जिल्ह्यातील ठराविक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारपर्यंत उष्ण तापमान राहणार असून सायंकाळीनंतर वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दोन ते तीन तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीस खबरदारी घेण्याची गरज असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.