महाराष्ट्रात 18 जुलैपर्यंत मुसळधारचा इशारा! या जिल्ह्यांना बसणार फटका, जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव/पुणे । राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून जळगावसह अनेक जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.जळगाव जिल्ह्याला देखील १६ जुलैपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागानं येत्या 18 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भाला देखील हवामान विभागाकडून ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 18 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान आज पुणे, सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, इथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. आज आणि उद्या जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सोमवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा 40- 50 किमी ताशी वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.