मुंबई / जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत ज्या योजना कार्यान्वित झाल्या नाहीत, त्या तातडीने सुरू कराव्यात. कंत्राटदारांनी कामे हाती घेऊन जी कामे वेळेत पूर्ण केली नाहीत, अशा कंत्राटदारांवर तीन सी नुसार कार्यवाही करून त्याच्याकडून वसुली करण्यात यावी. वीज जोडणी अभावी अपूर्ण राहिलेल्या पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले अशा ठिकाणी भूजल सर्वेक्षण करून नवीन स्त्रोत शोधावेत, असे स्पष्ट निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराब पाटील यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव बी.कृष्णा, मिशन संचालक ई. रविंद्रन, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ.विजय पाखमोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, कार्यकारी अभियंता जी. एस. भोगवडे, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, सदस्य तसेच जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदे मार्फत एकूण 1359 योजना राबविण्यात येत आहे. या योजनांपैकी 1193 योजना प्रगतीपथावर असून 166 योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून एकूण 26 योजना राबविण्यात येत असून 22 योजना प्रगतीपथावर आहेत. तसेच, 4 योजना कार्यान्वित झालेल्या असून 2 योजना भौतिकदृष्ट्या 100% पूर्ण झालेल्या आहे. या जिल्ह्यासाठी शासनाकडून एकूण रक्कम रुपये 1205 कोटी 58 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 1486 गावे असून त्यापैकी 1268 गावांची नळ जोडणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 1010 गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली. 631 गावांचे हर घर जल प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण 690798 कुटुंब संख्येपैकी 2 जुलै 2024 पर्यंत 690324 इतक्या कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा योजनांसाठी निश्चित केलेल्या स्त्रोतांची एकूण संख्या 1031 असून त्यापैकी 787 स्रोतांचे (76.30 %) जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात आलेले असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.