कडाक्याच्या थंडीसह धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम

तरुण भारत लाईव्ह।१२ जानेवारी २०२३।  जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा परिणाम दिसून येत आहे. नेहमीपेक्षा यावर्षी थंडीसोबत अचानक शीतलहरीचे आगमन झाले आहे. थंडीसोबतच भल्या पहाटेपासून दाट धुके पडत असल्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम दिसून येत आहे.
डिसेेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असणार्‍या हिवाळ्यातील वातावरणासह निर्माण होणारे दवबिंदू गहू, ज्वारी बाजरी आदी रब्बी पिकांच्या वाढीसह उत्पादन वाढीसाठी फायदेशीर आहे. असे असले तरी सद्य:स्थितीत शीतलहरीसह धुक्यामुळे गव्हावर तांबेरा तसेच उन्हाळी कांदेपात पिवळी पडण्याचा धोका निर्माण झालेला दिसून येत आहे. शिवाय बर्‍याच ठिकाणी तुरीच्या शेंगांवर व हरभराच्या घाट्यांवर अळी व रोग किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची देखील शक्यता दिसून येत आहे.

दीर्घकालीन पिकांवर परिणाम

जिल्ह्यात केळी प्रमुख पीक असून, सद्य:स्थितीत शीतलहर मोठ्या प्रमाणावर आहे. या अतिथंड वातावरणामुळे केळीची पाने पिवळी पडण्यासह पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. केळीच्या चांगल्या वाढीसाठी तापमान 16 ते 30 सेंटीग्रेडदरम्यान असणे गरजेचे आहे.

कीडनाशक फवारणी खर्चात वाढ

अतीथंड वातावरणामुळे गव्हाच्या उत्पादनावर तांबेरा तसेच उन्हाळी कांदे, हरबरा, तुर आदी पिकांवर घाटेअळीसह बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशक पावडर तसेच रासायनिक द्रव्य फवारणीसाठी शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
गहू, हरबरा अन्य रब्बी पिकांसह केळी पिकावर अती थंड वातावरणाचा होणारा परिणाम टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास कडाक्याच्या थंडीपासून केळीच्या बागांसह अन्य पिकांचे सरंक्षण होऊ शकते. केळीच्या बागा तणमुक्त ठेवाव्यात व मुख्य झाडाशेजारील पिकं नियमित कापावीत. बागेतील मुख्य झाडाचे कोणतेही पान कापू नये, फक्त रोगग्रस्त पानांचा भाग काढावा व बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. थंडीच्या दिवसात केळी पिकास रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा करावा. झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिझाड 250 ते 750 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून किंवा ठिबकद्वारे द्यावीत. बागेतील विषाणूजन्य रोगट झाडे समूळ नष्ट करावीत, करपा किंवा सिगाटोका रोगाचा प्रादूर्भाव आढळल्यास कार्बेन्डेझिम 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोन्याझॉल 10 ग्रॅम किंवा ट्रॉयडेमार्फ 10 ग्रॅम या बुरशीनाशकाची 10 लीटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी करावी, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिला आहे.