तरुणभारत लाईव्ह न्युज : इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान (Imran Khan) इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द समाप्त करण्याची तयारी सुरू झाली आहे. इम्रानपुढील अडचणी कमी होण्याचे नावच घेत नाही. आधी निवडणूक आयोगाने त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले, पण आता इम्रानवरील फास अधिकच आवळला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानेही त्यांना पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तोशखाना (सरकारी तिजोरीत भेटवस्तू जमा न करणे) प्रकरणात त्यांना संसद सदस्यत्वासाठी अपात्र ठरवल्यानंतर निवडणूक आयोग हे पाऊल उचलणार आहे. इम्रान खान हे पीटीआयचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी अतोनात कष्ट करून या पक्षाची उभारणी केली आणि एक समर्थ पक्ष म्हणून पाकिस्तानात स्वतंत्र ओळख निर्माड केली. (Imran Khan) इम्रान खान यांना खरोखरच पीटीआयच्या अध्यक्षपदावरून हटवले तर कदाचित त्यांच्या राजकीय कारकिर्दीला हा सर्वांत मोठा धक्का असेल. कारण त्यानंतर त्यांना पक्षाचे नेतृत्व दुसर्याच्या हाती सोपवावे लागेल. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना यासंदर्भात नोटीस देण्यात आली असून, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की, कोणताही कायदा कोणत्याही दोषी व्यक्तीला राजकीय पक्षाचा पदाधिकारी बनण्यापासून रोखू शकत नाही.
कलम 62 मुळे टांगती तलवार
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निवडणूक कायद्याविरोधातील याचिकांवर सुनावणी करताना, घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 अंतर्गत अपात्र ठरलेली व्यक्ती राजकीय पक्षाचे नेतृत्व करू शकत नाही, असा निर्णय दिला. म्हणजेच ते पक्षाचे अध्यक्ष राहू शकत नाहीत. या निर्णयामुळे कलम (62) (1) (एफ) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर पीएमएल-एनचे प्रमुख म्हणून नवाझ शरीफ यांचा निरोप घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, तोशखाना वादात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (Imran Khan) इम्रान खान यांना घटनेच्या कलम 63 अंतर्गत संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले होते. या अनुच्छेदात ‘खोटा तपशील आणि चुकीची माहिती’ दिल्याबद्दल सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार पंतप्रधानांना परदेशातून आलेल्या भेटवस्तू तोशखान्यात (सरकारी तिजोरी) जमा कराव्या लागतात. यातील भेटवस्तूंचे मूल्यमापन केले जाते. सरकारी अधिकार्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा अहवाल देणे आवश्यक आहे. तथापि, भेटवस्तू प्राप्तकर्ता तोशाखान्याकडून भेटवस्तू त्याच्या वास्तविक मूल्याच्या 50 टक्क्यांवर परत खरेदी करू शकतो. (Imran Khan) इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू अत्यंत कमी दरात खरेदी केल्या होत्या. माध्यमांच्या वृत्तानुसार, तोशखान्यातून मिळालेल्या भेटवस्तूंची किंमत 108 मिलियन पाकिस्तानी रुपये होती. पण इम्रानने या वस्तू 21.5 मिलियनमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे.