: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे डेमोक्रेटिक पक्षाचे ८१ वर्षीय उमेदवार जो बायडन आणि ७८ वर्षीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील पहिली वादविवाद चर्चा चांगलीच रंगली. अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार, गुरुवार, दि. २७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या वादविवाद चर्चासत्रात दोन्ही उमेदवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. पण, या चर्चासत्रात डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक, तर जो बायडन बरेच गोंधळलेले दिसून आले.
अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था, आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची घसरलेली पत यांसारख्या मुद्द्यांवर ट्रम्प यांनी बायडन यांना घेरले, तर बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना, त्यांच्या खासगी आयुष्यातील घटनांवर ताशेरे ओढले. तसेच ट्रम्प यांच्यावर टीका करताना बायडन यांनी ट्रम्प यांच्यावरील गुन्ह्यांवरही बोट ठेवले. या वादविवाद चर्चेमध्ये बायडन यांनी ट्रम्प यांच्या आक्रमक टीकेला उत्तर देण्याचा माफक प्रयत्न केला. मात्र, म्हणावा इतका त्यांचा प्रभाव दिसून आला नाही. तसेच ट्रम्प यांनी देखील मागील निवडणुकीत दाखवलेला अतिआक्रमकपणा टाळत, बायडन यांना अडचणीच्या मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला.
या वादविवादात ‘सीएनएन’ने घेतलेल्या ऑनलाईन मतदानात ६७ टक्के प्रेक्षकांनी ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला, तर ३३ टक्के प्रेक्षकांना बायडन अधिक आश्वासक वाटले. बायडन यांच्या प्रचार विभागाने या वादविवादाच्या आधी बायडन यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे जाहीर केले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेली हे पहिलेच चर्चासत्र असून, यापुढे अशा चर्चासत्रांमधून पुन्हा ट्रम्प आणि बायडन आमनेसामने येणार आहेत.
वादविवाद चर्चेतील उमेदवारांनी मांडलेले ठळक मुद्दे
डोनाल्ड ट्रम्प-
– बायडन यांनी जगातील युद्ध रोखण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन दिले. रशिया-युक्रेन युद्ध बायडन यांच्या भूमिकेमुळेच वाढले. माझ्या काळात जगात एकही युद्ध झाले नाही.
– माझ्या काळात महागाई दर स्थिर होता, महागाई आवाक्यात असलेला देश मी बायडन यांना दिला. मात्र, बायडन यांच्या काळात महागाईने उच्चांक गाठला.
– अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची अवस्था बिकट. किराणा साहित्यदेखील ते खरेदी करु शकत नाहीत. युद्ध परिस्थितीमुळे पलायन करुन अमेरिकेत दाखल झालेल्या स्थलांतरितांनी स्थानिक नागरिकांच्या नोकर्या बळकावल्या.
– स्थलांतरितांच्या वाढत्या प्रमाणाने अमेरिकेच्या गुन्हेगारीत वाढ होईल.
– गर्भपाताच्या अधिकाराच्या मुद्द्यावर डेमोकॅ्रटिक पक्षाच्या धोरणांवर ट्रम्प यांची सडकून टीका.
– पर्यावरण क्षेत्रात माझ्या सरकारच्या काळात अमेरिकेने सर्वोत्तम कामगिरी केली.
जो बायडन
–
पुतीन हेच युद्धाचे गुन्हेगार असून, त्यांच्या विस्तारवादी मानसिकतेमुळे ‘नाटो’ला धोका निर्माण झाला होता, तर इस्रायलच्या बाबतील सर्वतोपरी सहकार्य करुन आम्हीच इस्रायलला वाचवले आहे.
-डोनाल्ड ट्रम्प हे माझ्यासाठी घसरणारी अमेरिकी अर्थव्यवस्था सोडून गेले.
वाढत्या महागाईचा कृष्णवर्णीय कुटुंबावर विपरीत परिणाम होत आहे. पुढच्या सरकारच्या काळात त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी निधी राखीव केला जाईल.
-माझ्या कार्यकाळात अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य सन्मानाने बाहेर पडले. पण, ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी तिथे लोकांचे रक्त सांडले.
-माझा मुलगा अपयशी नाही आणि शोषण करणाराही नाही. पण, तुम्ही (ट्रम्प) शोषण करणारे आणि अपयशी आहात.
-पर्यावरण संरक्षणासाठी मी पॅरिस शांतता करारात सहभागी झालो.